ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या कसोटी मालिकेत कर्णधारपद भूषवित असलेल्या ३३ वर्षीय महेंद्र सिंग धोनीने काल तडकाफडकी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळे चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत शेवटच्या कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. धोनीच्या कसोटी संन्यासाची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली.कसोटीतून संन्यास घेतला असला तरी धोनी पुढील महिन्यात होणार्या ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या वन डे मालिकेसह आगामी २०१५च्या विश्व चषक या स्पर्धामध्ये खेळण्याबरोबरच संघाचे नेतृत्वही करणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. सर्व प्रकारचे क्रिकेट खेळल्यामुळे पडणार्या ताणामुळे धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्याचेही बीसीसीआयने म्हटले आहे.
श्रीलंकेविरुध्द चेन्नई येथे २००५ साली पदार्पण केल्यानंतर धोनी आतापर्यंत ९० कसोटी सामन्यांमध्ये खेळला आहे. त्यात त्याने सहा शतके व ३३ अर्ध शतकांसह ४८७६ धावा नोंदवल्या आहेत. विद्यमान कसोटी मालिकेत भारत २-० असा पिछाडीवर आहे.