कसोटीतही विराट अव्वल!

0
113

>> उपकर्णधार अजिंक्य रहाणेची घसरण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आयसीसी कसोटी क्रमवारीत आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्टीव स्मिथला मागे टाकत कोहलीने पहिला क्रमांक आपल्या नावे केला होता. कोहलीचे सध्या ९२८ रेटिंग गुण झाले असून ऑस्ट्रेलियाच्या स्मिथपेक्षा त्याचे १७ गुण अधिक आहेत.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन तिसर्‍या स्थानावर आहे. भारताचा चेतेश्‍वर पुजारा चौथ्या तर ऑस्ट्रेलियाचा मार्नल लाबुशेन पाचव्या स्थानी आहे. लाबुशेन याने ताज्या क्रमवारीत तीन स्थानांची सुधारणा केली आहे. श्रीलंकेविरुद्ध कराची कसोटीत शतक ठोकून पाकिस्तानच्या बाबर आझम याने कारकिर्दीतील सर्वोत्तम सहावे स्थान प्राप्त केले आहे. यामुळे भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याची सातव्या स्थानी घसरण झाली आहे. रहाणेनंतर डेव्हिड वॉर्नर, ज्यो रुट व रॉस टेलर यांचा क्रमांक लागतो. मयंक अगरवाल (१२) व रोहित शर्मा (१५) हे ‘टॉप २०’मधील अन्य भारतीय आहेत.

आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ ३६० गुणांसह अव्वल स्थानी आहे. वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका व बांगलादेश या अजूनही गुणांचे खाते न उघडलेल्या संघांविरुद्धच्या मालिका विजयांचा फायदा टीम इंडियाला झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ २१६ गुण घेत दुसरा क्रमांक मिळविला आहे. श्रीलंकेविरुद्धची कराची कसोटी जिंकून पाकिस्तानने ६० गुण कमावले आहेत. अनिर्णित राहिलेल्या पहिल्या कसोटीतील २० गुणांसह त्यांनी आपली गुणसंख्या ८० केली आहे. श्रीलंकेचा संघदेखील ८० गुणांवर आहे. गोलंदाजांमध्ये भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे सहावे स्थान कायम आहे. दुखापतीमुळे मागील काही महिने क्रिकेटपासून दूर राहूनही त्याने ‘अव्वल १०’मधील स्थान राखले आहे. अष्टपैलूंमध्ये भारताचा रवींद्र जडेजा दुसर्‍या तर विंडीजचा जेसन होल्डर पहिल्या स्थानी आहे.