कसोटीची वेळ

0
185

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा झाकोळ काल रविवारच्या दिवसावर राहिला. एक उभरता गुणी अभिनेता असा एकाएकी कधीही परत न येण्याच्या काळोख्या मार्गाने स्वतःहूनच का गेला असावा हे कोडे आता त्याच्या लक्षावधी चाहत्यांसाठी मागे उरले आहे. कोरोनाने सध्या संपूर्ण जगावर नकारात्मकतेच्या कृष्णछाया आणलेल्या आहेत. सततच्या लॉकडाऊनमधून मनामनांवर वाढलेला ताणतणाव, उणावलेला आत्मविश्वास, लांबणीवर ढकलल्या गेलेल्या व्यावसायिक संधी, त्यातून निर्माण झालेले आर्थिक, व्यावहारिक पेच या सार्‍यांशी संपूर्ण जग आज झुंजते आहे. असे एकही क्षेत्र नाही, ज्याच्यावर कोरोनाच्या या अनिष्टपर्वाचा काही ना काही विपरीत परिणाम झालेला नाही. त्यामुळे सुशांतसारख्या गुणी आणि यशस्वी अभिनेत्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण जरी अजून स्पष्ट नसले, तरीही त्याला असलेली ही कोरोनाची पार्श्वभूमीही दुर्लक्षिण्याजोगी नाही. काळ जरी कठीण आलेला असला, तरी सकारात्मकतेचे बीज सतत आपल्या मनात रुजेल, वाढेल यासाठी प्रयत्नरत राहण्याची आज नितांत आवश्यकता आहे.
देशातील कोरोनाबाधितांचे आकडे दिवसागणिक वाढतच चालले आहेत. प्रतिदिन अकरा हजारांवर नवे रुग्ण समोर येत असताना आणि सध्या कोरोनाशिवाय दुसरा कोणताच विषय समोर नसताना मनाची प्रसन्नता कायम राखणे तसे सोपे नाही. परंतु तरीही या कृष्णपर्वामध्ये आपल्या छंदांमध्ये मन गुंतवून, मिळालेल्या उसंतीचा काही रखडलेले संकल्प साकारण्यासाठी सदुपयोग करून या जणू सध्या थांबलेल्या काळावर मात करण्यासाठी लोक पुढे सरसावत आहेत ही खरोखर प्रशंसनीय अशी गोष्ट आहे.
गोव्याच्या कोविड इस्पितळामध्ये उपचार घेत असलेल्या एका गरोदर स्त्रीची प्रसूती शस्त्रक्रिया डॉ. अंकिता सिनाय बोरकर आणि सहकार्‍यांनी ज्या धाडसाने आणि निर्धाराने केली, ती खरोखर वैद्यकीय क्षेत्राविषयीचा आदरभाव वाढविणारी घटना आहे. कोविड रुग्णालयात जन्मलेले हे नवजात बाळ हा या अंधारपर्वातही उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे कोंभ कसे लवलवत आहेत याचे जणू प्रतीक आहे. कोविड इस्पितळामधील शस्त्रक्रियेतून आशेची ही वात लावणार्‍या या डॉक्टर मंडळींचे आम्ही गोमंतकीय जनतेच्या वतीने जाहीर अभिनंदन करतो.
राज्यातील परिस्थिती हळूहळू हाताबाहेर चालली आहे की काय असे वाटावे असे आकडे रोज समोर येत आहेत. तोकड्या कपड्यांनिशी स्वतःचे अंग झाकायचा प्रयत्न करावा आणि त्यात ते अधिकाधिक उघडे पडावे तसे राज्य सरकारचे सध्या कोरोनाच्या बाबतीत झाले आहे. ‘कोरोना’ आणि ‘कोविड १९’ हे वेगवेगळे असल्याची लोणकढी कागदोपत्री ‘रुग्ण’संख्या भले कमी दाखवील, परंतु गावोगावी जे काही सुरू झाले आहे, ते कसे थोपवील? कोरोना म्हणजे काही विशेष नाही. साधी सर्दी आणि तापासारखा किरकोळ, क्षुल्लक आजार आहे असे भासवल्याने दिवसागणिक वाढत चाललेला आकडा कसा कमी होईल? त्यामुळे दिवसागणिक वाढते आकडे हे आजचे नवे वास्तव आहे आणि सर्वांनी ते आधी मान्य करण्याची आज आवश्यकता आहे.
राज्याबाहेरून येणार्‍या रुग्णांना कोविड चाचणीची सक्ती रद्दबातल करून सरकारने यापुढे केवळ लक्षणे असलेल्यांच्याच चाचण्या करण्याची घोषणा केली होती, परंतु त्यानंतर जे घडले ते पाहाता असे दिसते की पूर्वीपेक्षा अधिक चाचण्या करण्याची वेळ आता प्रशासनावर ओढवलेली आहे, कारण हे रुग्णांचे लोण आता जवळजवळ सर्व तालुक्यांत गावोगावी पोहोचले आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या कमी करण्याऐवजी उलट कितीतरी पटींनी वाढवण्याची पाळी सरकारवर ओढवली आहे. लॉकडाऊनच्या काळात रोज सरासरी पाचशे – सहाशेच्या दरम्यान कोविड चाचण्या घेतल्या जात असत. दर्यावर्दी येऊ लागले, रेल्वे, विमाने सुरू झाली तशी दैनंदिन चाचण्यांची संख्या हजारावर गेली. लॉकडाऊन उठल्यानंतर त्यांचे प्रमाण वाढत गेले आणि आता तर ते दोन हजारांच्याही वर गेलेले आहे. मोर्ले, चिंबल, ताळगाव, मोतीडोंगर आदी भागांमध्ये तेथील स्थानिक राजकीय नेत्यांच्या आग्रहाखातर आम जनतेच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर सरकारला हाती घ्याव्या लागल्या. सीमांवर सक्तीच्या चाचण्या घेतल्याने राज्यामध्ये जी निर्धास्तता दिसत होती ती आता राहिलेली नाही आणि उलट गावोगावी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर चाचण्या कराव्या लागतच आहेत, मग एस. ओ. पी. बदलल्याने फायदा काय झाला? उलट हे लोण सीमांवरच रोखले न जाता सर्वत्र पसरत, फैलावत गेले आहे. त्याला मुख्यत्वे जबाबदार ठरले आहेत ते खुद्द सरकारचेच कर्मचारी. मांगूरहिलमधून त्यांनी हे कोरोनाचे लोण गावोगावी नेले. आरोग्य खात्याचाच वाटा त्यात मोठा राहिला आहे. शिवाय कदंब वाहतूक महामंडळ, टपाल खाते आदींच्या कर्मचार्‍यांचेही त्यात योगदानही आहेच. परिणामी संपूर्ण गोवा आज असुरक्षिततेच्या छायेखाली आलेला आहे. त्यावर पडदा ओढण्याचा प्रयत्न कोणी कितीही प्रकारे जरी केला, तरी हे वास्तव आता झाकता येणारे नाही. दिल्लीमधील सद्यस्थितीचा आढावा नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जातीने घेतला. त्यामध्ये त्यांनी तेथील कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा सल्ला दिल्ली प्रशासनाला दिला आहे. आपण मात्र नेमके उलट्या दिशेने निघालो होतो, परंतु परिस्थितीच अशी निर्माण झाली की चाचण्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढवावी लागली आहे. सरकारी आकड्यांमध्ये पारदर्शकता अजूनही आलेली नाही. ‘ऑल इज वेल’ भासवण्याचा प्रयत्न अंगलट येत चालला आहे. काय घडते आहे हे आता लोकांना उमगलेले आहे. त्यामुळे स्वतःहून लॉकडाऊन करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनताच आता स्वयंस्फूर्तीने पुढे सरसावलेली आहे.
राज्य सरकारला कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन उपचार सुविधा वाढवाव्या लागल्या आहेत. शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूपांतर कोविड केअर सेंटरमध्ये केल्यानंतर आता केपे येथील संपूर्ण सरकारी महाविद्यालय आणि ऑडिटोरियम, वास्को येथील एमपीटी इस्पितळ इ. ताब्यात घेऊन तेथे नवे कोविड केअर सेंटर सुरू केली जाणार आहेत. बांबोळीच्या श्यामाप्रसाद स्टेडियमचे रूपांतर नव्या कोविड इस्पितळात करण्याचा विचार चालला आहे. हे सगळे आता राज्यातील परिस्थिती पाहिल्यास अपरिहार्य आहे आणि ज्या वेगाने नव्या रुग्णांची भर पडत चालली आहे, ते पाहाता लवकरात लवकर पूर्णत्वास जाणे जरूरी आहे. सरकारसाठी जे कसोटीचे क्षण निर्माण होतील असे आम्ही म्हटले होते, ती वेळ आता आलेली आहे. हे आव्हान सरकार कसे पेलते हे येणार्‍या काळात दिसेलच!