- मीलन अंबाजी कामत
आम्ही मडकईच्या ‘नंदादीप’ घरात, आमच्या मोठ्या कुटुंबात एकत्र राहत होतो. काही वर्षांनंतर नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी काही लोकांना पणजीला जावे लागले. सासू-सासरे पणजीला राहायचे, त्यामुळे मलाही पणजीला राहावे लागले. त्यावेळी हरी घनश्याम कामत हे आमच्या शेजारीच राहत असत. ती सात भावंडे व त्यांचे वडील एकटेच कमावणारे. हरी शिष्यवृत्ती मिळवून, कष्ट करून शिक्षण घ्यायला लागले. बी.कॉम. झाल्यावर संध्याकाळी सायकलवरून जाताना मी त्यांना रोज पाहायचे. त्यांचा पोशाख म्हणजे एक हाफ पँट व टी-शर्ट. दुपारनंतर ते ‘सीए’कडे काम करायचे आणि नंतर एके ठिकाणी हिशेबनीस म्हणून काम करायचे. यातून त्यांना खूप अनुभव मिळाला. काम करायची गोडी लागली. पैशांची गरजदेखील काही प्रमाणात भागायची.
1982-83 साली त्यांनी स्वतः विविध गुंतवणूक योजनांसंबंधी (जसे की पोस्ट ऑफिस, रिकरिंग डिपॉझिट, एलआयसी, पीपीएफ) ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच त्यांचे लक्ष उंच भरारी मारण्याकडे होते. त्यांनी गोव्यासारख्या लहानशा शहरातील ग्राहकांना आकर्षित करतील अशा नवनवीन कल्पना लढवल्या. त्यांच्या ग्राहकांना या नवीन गुंतवणूक योजना आवडायच्या. हरी यांनी त्यावेळी नवीन असलेल्या गुंतवणूक योजनांत- जसे की म्युच्युअल फंड, यूटीआय, एसबीआय, कॅनरा, बीओआय यांमध्ये- दुसऱ्यांना विकायच्या आधी स्वतःचे पैसे गुंतवले. आता ते अभिमानाने सांगतात की, त्यांचे ‘एयूएम’ (व्यवस्थापन अंतर्गत बाजारमूल्य) 1000 कोटींच्या घरात पोहोचले आहे, तेसुद्धा गोव्यासारख्या निमशहरी भागात. त्यांच्या इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरीचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत, ते म्हणजे- सुरक्षा, पाठिंबा आणि नाते.
त्यांचे गुंतवणूकदार ग्राहक त्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्यामुळे ते या सर्वांचेच पैसे सुरक्षित राहतील याकडे लक्ष देतात व गरज पडल्यास त्यांना ते कसे उपयोगी पडतील या गोष्टीला प्राधान्य देतात. डॉक्टरवर रुग्णांचा जसा विश्वास असतो तसाच गुंतवणूकदार ग्राहकसुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवतो. आता तर मडगावात आपल्या जावई व मुलाला ऑफिस उघडून देऊन त्यांनी आपल्या व्यवसायाची परंपरा पुढे चालू ठेवली आहे.
सध्या नवे गुंतवणूकदार ग्राहक म्हणजे पुढची पिढी त्यांच्याकडे येऊ लागली आहे. बाजारभाव (मार्केट) उतरल्यावरसुद्धा गुंतवणूकदार ग्राहक घाबरले नाहीत; उलट त्यांनी त्यांची गुंतवणूक वाढवली. आताच्या पिढीला पैशांचं महत्त्व कळायला पाहिजे. जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वडिलांनी कमावलेल्या पैशांवर मौजमस्ती करणे सोपे असते, आपण ते पैसे केव्हाही गमावू शकतो म्हणून नवीन पिढीने सावध राहिले पाहिजे.
हरी यांनी कष्ट केले, त्यातून उंच भरारी मारली तरी त्यांचे पाय कायम जमिनीवरच राहिले. आपण केलेल्या कामाचा त्यांना अभिमान आहे पण गर्व नाही. म्हणून तर ते आज गोव्यातच नाही, जगभरात प्रसिद्ध आहेत. 40 वर्षे अथक प्रयत्न करून त्यांनी पणजी शहरात ‘इन्व्हेस्टमेंट अवेन्यू’चे ऑफिस सुरू केले. मला वाटते नवीन पिढीनेदेखील त्यांचे अनुकरण करावे.
हरी कामत यांना मिळालेले काही पुरस्कार व मानसन्मान
- गोवा राज्य सरकारने त्यांना सर्वोच्च पी.पी.एफ. गुंतवणुकासाठी सन्मानित केले.
- 2012 मध्ये सी.एन.बी.सी. टीव्ही 18 ने त्यांना सर्वोत्कृष्ट वित्तीय सल्लागार म्हणून सन्मानित केले.
- नुकत्याच पार पडलेल्या वेल्थ फोरमच्या समारंभामध्ये हरी कामत यांना ‘थिंक बिग’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पण हरी काम यांच्यासाठी सर्वात सन्मानाची गोष्ट हीच आहे की, आजपर्यंत त्यांनी जवळपास 300 गुंतवणूकदारांना करोडपती बनवले.