कष्टकरी स्त्रियांचे दवले – माणीचे वादन

0
206

– शुभदा च्यारी

दवले माणीचा वाजाप

गणोबा बसलो मखरात
त्याजो उनराचो वारू
महादेव बसला मखरात
आमची गवुर गोकुळात
तुळस माता निबरात

भल्या पहाटे असे सूर कानावर पडायचे. झोपलेल्या गणोबाला जागे करण्यासाठी ती घरात असणार्‍या माण आणि दवली घेऊन एक प्रकारचे संगीत तयार करायची. त्या संगीताच्या नादात गीतांचे सूर जोडून तिचे दवले – माणीचे वाजप सुरू व्हायचे.
आज आपण स्वयंपाकघरात अनेक प्रकारची ऍल्युमिनियम, स्टीलची भांडी वापरतो. परंतु एकेकाळी दवली आणि माण हे स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक होते. नारळाच्या करवंटीपासून तयार केलेली दवली, विविध मिष्टान्नाचे प्रकार वाढण्यासाठी वापरली जायची. वेगवेगळ्या करवंटीच्या आकारानुसार बांबूच्या काट्या लावल्या जायच्या. फणसाच्या लाकडापासून तयार केली गेलेली माण ही पीठ मळण्यासाठी वापरली जायची. या दोन्ही वस्तूंचा उपयोग मोठ्या कल्पकतेने स्त्रियांनी करून त्याला लोकवाद्याचे रूप दिले.
लेकीमानसाने गणपतीला देवत्वाबरोबर मानवत्वही दिले. त्यामुळे आपण झोपतो तेव्हा देवही झोपतो. आणि आपण उठतो तेव्हा देवही उठतो असा समज निर्माण झाला. म्हणूनच झोपी गेलेल्या या देवाला दवलेमाणीचे वादन करून लोकगीतांचे गायन करून जागविले जायचे. सत्तरी, पेडणे, डिचोली त्याचबरोबर गोव्याच्या सीमा भागातील गावांमध्ये दवले – माण वादन केले जायचे. चवथीच्या दिवसांत सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला माण उलटी घेऊन त्याच्या दांड्याच्या साहाय्याने मागे – पुढे करत माणीवर त्यांचे घर्षणातून एक वेगळे संगीत सकाळच्या नीरव शांत वातावरणात मन प्रसन्न करणारे होते. तिन्ही सांजेला वाजवल्या जाणार्‍या दवली माणीला कोको वादन म्हटले जायचे.
शेजारच्या बायू कोको वाजयगो
पायली भर पाकड दितय आणखी वाजय गो
घे तुका पाकड दि माझा कापाड
आड्या तिड्या नेसशीत गो
पिनुन फाटून दिशीत गो
ता मिया घेवचूय ना
शेजार्‍यांच्या घरात चाललेले सुमधुर वादन ऐकूनही ती प्रसन्न होते. गणपतीशी निगडीत अनेक प्रश्‍न व त्यांची उत्तरेही ती या लोकगीतांतून सहजपणे देते. कधी कधी स्त्रीमनाचे भावविश्‍व ती उभे करते; तर कधी गणपतीबरोबर येणार्‍या गौरीलाही ती माहेरवाशीण करते.
केळीच्या बेटा झिरीमिरी पाणी
आमची गवुर पाणीशी भरी
आमची गवुर मायेरा जाता
लेणा लेईता कुकमाचा गे
इथला कष्टकरी समाज जेव्हा दमून भागून यायचा किंवा घरातील कामे आटोपल्यानंतर करमणुकीचे साधन म्हणूनही अशा प्रकारचे वादन केले जायचे. गोव्यातील नव्हे तर मोजक्याच भारतातील आदिवासी तसेच कष्टकरी समाजात अशा प्रकारचे वादन दृष्टीस पडते.
दवले माणीतून निर्माण होणार्‍या पार्श्‍वसंगीतावर सादर होणारी लोकगीते एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे संक्रमित व्हायची. या लोकगीतांचा कर्ता कोण? त्यांची रचना कोणी केली?? याची नोंद लोकगायिकांनी कधी ठेवली नाही. या गाण्यांतून कष्टकरी समाजात पूर्वापार चालत आलेली गणपतीविषयीची श्रद्धा – भक्ती, आत्मीयता यांचे मनोज्ञ दर्शन घडते. कष्टकरी समाजाला जगण्यासाठी पदोपदी संघर्ष करावा लागतो. त्यांचे जीवन सहज आणि सोपे नसते. परंतु असे असतानाही आपल्या आराध्य दैवताविषयी अंतरी असलेला भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी या वादन आणि गायन परंपरेचे अवलंबन केले जायचे.
लोकगीतांना संगीताची पार्श्‍वभूमी देण्यासाठी धातू, तंतू, चर्म आदी घटकांपासून तयार केलेल्या लोकवाद्यांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. परंतु दवले – माणीच्या गायनासाठी, पार्श्‍वसंगीत देण्यासाठी स्वयंपाकघरात एकेकाळी वापरल्या जाणार्‍या दवले आणि माण सारख्या वस्तूंचा उपयोग करणे ही खरोखर त्यांच्या भावस्पंदनाचे दर्शन घडविते. दवले – माणीची लोकगीते आणि त्यांच्यासाठी निर्माण केले जाणारे पार्श्‍वसंगीत हा वारसा एकेकाळी चूल आणि मूल सांभाळणार्‍या स्त्रियांनी एका पिढीकडून दुसर्‍या पिढीपर्यंत जपून ठेवल्याने त्याचे दर्शन अनुभवायला मिळते.
दवले – माणीच्या गायन आणि वादनाची परंपरा ही स्त्रीमनात उमटणार्‍या नानाविविध भावस्पंदनांचे दर्शन घडवते. त्यांनी रचलेल्या या पारंपरिक लोकगीतांची भाषा नागर समाजातील स्त्रियांच्या भाषेहून भिन्न असली तरी त्या प्रतिबिंबित झालेले भावविश्‍व, विचारसौंदर्य आणि काव्यगुण या दृष्टीने विचार केला असता कुठेच कमीपणा आढळत नाही. शेता-भातात, रानावनात कष्टकर्‍यांच्या तोंडी असलेली भाषा या लोकपरंपरेतून आलेली दृष्टीस पडते. फुगडी हे लोकनृत्य गणेश चतुर्थी, धालो, धिल्लो, कायतो या लोकोत्सवांच्या प्रसंगी आणि अन्य धार्मिक उत्सवात सादर केले जाते. परंतु दवले – माणीचे वादन हे वर्षातून भाद्रपद महिन्यात चतुर्थीच्या सण – उत्सवात सादर केले जाते. घरात कष्टाची कामे करणारी स्त्री आपल्यातील कलाकाराला जणूकाही वर्षभर विसरलेली असते. तिच्यातली गायिका संगीतकार याचे दर्शन दवले – माणीच्या परंपरेतून घडते. या आविष्कारातून जीवनातून ताणतणाव, ताप-व्याप काही काळासाठी लुप्त होतात आणि त्या परमेश्‍वराच्या रूपाशी एकरूप होतात.
……………