कश्यप उपांत्यपूर्व फेरीत

0
93

भारताच्या पारुपल्ली कश्यप याने मलेशियाच्या डॅरेन ल्यू याचा काल गुरुवारी २१-१७, ११-२१, २१-१२ असा तीन गेममध्ये पराभव करत कोरिया ओपन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ५०० स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. २०१८च्या विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकलेल्या डॅरेन याला नमविण्यासाठी ३३ वर्षीय कश्यपला ५२ मिनिटे लागली. पुढील फेरीत कश्यपचा सामना जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या जान ओ जॉर्गेनसन याच्याशी होणार आहे. तब्बल पाच वर्षांपूर्वी डेन्मार्क ओपनमध्ये ही दुकली आमनेसामने आली होती.

जॉर्गेनसन याच्याविरुद्ध कश्यपचा रेकॉर्ड २-४ असा आहे. कालच्या लढतीत डॅरेनने चांगली सुरुवात करत पहिल्या गेममध्ये ४-२ अशी आघाडी घेतली. परंतु, मध्यंतरापर्यंत कश्यपने पुनरागमन करत ११-८ अशी आघाडी घेतली. यानंतर सलग चार गुण घेत कश्यपने १५-१० असे अंतर वाढविले. डॅरेनने यानंतर लागोपाठ गुण घेत अंतर १४-१५ असे कमी केले. १८-१७ अशा स्थितीत असताना कश्यपने सलग तीन गुण मिळवत पहिला गेम आपल्या नावे केला. दुसर्‍या गेममध्ये डॅरेनने अप्रतिम खेळ केला. त्याने कश्यपवर १३ गुणांची मोठी आघाडी घेतली. हे अंतर कमी करून दुसरा गेम जिंकणे कश्यपला शक्य झाले नाही. त्यामुळे सामना तिसर्‍या गेमपर्यंत लांबला. निर्णायक गेममध्ये कश्यपने १-२ अशा पिछाडीवरून १२-२ अशी मोठी आघाडी आपल्या नावे केली. या मोठ्या आघाडीनंतर कश्यपने मागे वळून न पाहता तिसर्‍या गेमसह सामना आपल्या नावे केला. या स्पर्धेतील अन्य भारतीयांचे आव्हान यापूर्वीच आटोपले असून कश्यपने देशाचा झेंडा फडकत ठेवला आहे.