कशाला हव्यात या निवडणुका?

0
109

गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका विद्यार्थ्यांच्या दोन गटांतील संघर्षामुळे लांबणीवर ढकलण्याचा निर्णय गोवा विद्यापीठाने काल घेतला. विशेष म्हणजे ज्या दोन गटांमध्ये झडलेल्या संघर्षामुळे या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या, ते दोन्ही गट एकाच विचारधारेचे आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्ष प्रणित विद्यार्थी आघाडी यांच्यातील हा संघर्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराचेच हे दोन्हीही घटक. मग असे असताना हीच मंडळी एकमेकांशी लढण्यास उभी राहते आणि एकमेकांच्या उरावर बसते हे कसे काय? हा जो काही प्रकार झाला आहे तो अतिशय हास्यास्पद आहे. पूर्वी विद्यापीठ निवडणुकांमधून परस्पर विरोधी विचारधारांच्या प्रतिनिधींमध्ये चुरशीचा संघर्ष व्हायचा. विद्यार्थी चळवळीत पूर्वी अभाविप व कॉंग्रेसप्रणित एनएसयूआय किंवा त्याही पूर्वी स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया किंवा प्रोग्रेसिव्ह स्टुडंटस् युनियन आदी डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांशी संघर्ष व्हायचा. अनेक वर्षे अभाविपने विद्यार्थी मंडळांच्या या निवडणुकांवर व विद्यार्थी मंडळावर वर्चस्व राखले. त्या विद्यार्थी चळवळीतूनच नरेंद्र सावईकर, विश्वास सतरकर, अजितसिंह राणे असे विद्यार्थी नेते घडले ज्यांनी आज राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आपले स्थान मिळवलेले आहे. गोव्याच्या विद्यार्थी चळवळीला फार मोठा इतिहास आहे. अभाविपच्या गोव्यातील उदयापूर्वी डाव्या विद्यार्थी संघटनांचे गोव्यात प्रभावी वर्चस्व होते. विविध राजकीय, सामाजिक प्रश्नांसाठी तेव्हा विद्यार्थी रस्त्यावर यायचे, झगडायचे. व्होडितला ट्रस्टविरोधातील आंदोलन असो, बसच्या अर्ध्या तिकिटासाठीचे आंदोलन असो किंवा नार्वेकर विनयभंग आंदोलन असो, अखिल गोवा विद्यार्थी आघाडी त्याविरुद्ध वेळोवेळी एकजुटीने व अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर येत असे आणि आंदोलन विजयी करून दाखवीत असे. पुढे त्या विद्यार्थी चळवळीतली मंडळी प्रस्थापित बनली व चळवळ ओसरली. कॉंग्रेसच्या राजवटीच्या काळात अभाविपविरोधात एनएसयूआय हिरीरीने निवडणुकीत उतरत असे. परंतु गोव्यामध्ये भाजपचा उदय होत गेला तशी कॉंग्रेसच्या या विद्यार्थी चळवळीतली धगही ओसरत गेली. सत्ता येताच सुस्तीही येते तशा प्रकारे अभाविपचे गोव्यातील काम काही वर्षे थंडावत गेले. ती पोकळी भरून काढत भारतीय जनता पक्षाने विद्यार्थी आघाडी उघडून विद्यापीठ निवडणुकांमध्ये उतरण्यास सुरूवात केली. सरकार पाठीशी असल्याने त्यांना यशही येत राहिले, तशी अभाविप पुन्हा जागी झाली आणि भाजप प्रणित विद्यार्थी संघटना आणि अभाविप असा विचित्र संघर्ष सुरू झाला. खरे तर एकाच विचारधारेच्या या दोन संघटनांमधील संघर्ष जोवर वैध लोकशाही मार्गाने चालत आला होता तेथवर ठीक होते, परंतु आता एकमेकांविरुद्ध पोलीस तक्रारी करण्याविरुद्ध मजल गेली आहे. मुळात ह्या तथाकथित विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकांचे प्रयोजन अनाकलनीय आहे. विविध महाविद्यालयांतून विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जातात आणि त्यातून विद्यापीठ विद्यार्थी मंडळाची ही निवडणूक होते. देशातील इतर विद्यापीठांमधूनही अशा निवडणुका होतात म्हणून ती गोवा विद्यापीठात घेतली जाते एवढेच. बाकी या तथाकथित विद्यार्थी मंडळांमधून किंवा विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडीतून विद्यार्थ्यांचे काहीही भले झाल्याचे उदाहरण नाही. तथाकथित विद्यार्थी नेत्यांना चमकोगिरी करण्यासाठी मात्र हे एक साधन मिळते. हा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उगाच लठ्ठालठ्ठी करण्याचा प्रकार कशासाठी सुरू ठेवला गेला आहे हाच खरे तर प्रश्न आहे. अलीकडे विद्यार्थी चळवळ आहे कोठे? फार तर काही फुटकळ कार्यक्रम करणे आणि बहुतांशी कोरडी पत्रकबाजी करणे यापुरतीच गोव्यातील विद्यार्थी चळवळ उरली आहे. आजकाल विद्यार्थी आंदोलने व्हॉटस्‌ऍपवर होतात, असे त्यामुळे विनोदाने म्हटले जाते. विद्यार्थी चळवळ ही नेहमी व्यवस्थेच्या विरोधात असावी अशी अपेक्षा असते. देश संकटात असल्याचे पाहून जयप्रकाश नारायणांनी विद्यार्थ्यांचेच भव्य आंदोलन उभारले होते आणि त्याने इतिहास घडवला होता. ती बंडखोर रग आजच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. आजची विद्यार्थी चळवळ ही वरणभातावर पोसली गेलेली वाटते. त्यामुळे उगाच हे निवडणुकांचे देखावे कशाला? कोठे काही चुकीचे घडत असेल तर त्याविरुद्ध लढण्यासाठी विद्यार्थी चळवळीची गरज भासते, सत्तेची ऊब उपभोगण्यासाठी नव्हे. येथे तर सत्ताधारी भाजपच्याच संघ परिवारातल्या दोन संघटना एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे करून लुटूपुटूची लढाई खेळण्यात दंग दिसत आहेत. यात कोणापाशी जास्त विद्यापीठ प्रतिनिधी आहेत आणि कोणाला आपली हार दिसते आहे याचा हिशेबही मांडता येईल. मग या संघर्षामागील कारणे उमगतील, परंतु मुळात या निवडणुका म्हणजे शिक्षणक्षेत्रातील वातावरण बिघडवण्याचा, कॅम्पसवर हिंसाचाराला थारा देण्याचा आणि प्रामाणिक, अभ्यासू विद्यार्थ्यांना नाहक उपद्रव देणारा प्रकार जर होत असेल तर त्याबाबत फेरविचार होणेच श्रेयस्कर ठरेल!