कशाचे स्मारक?

0
115

मुंबईजवळ अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमीपूजन नुकतेच झाले खरे, परंतु ज्या शिवाजी महाराजांनी ‘मराठा तितुका मेळवावा’ म्हणत अवघ्या मराठी माणसाला एका सूत्रात बांधले आणि जणू रामराज्यच वाटावे असे हिंदवी स्वराज्य घडविले, त्या महापुरुषाचे नाव घेऊन महाराष्ट्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष शिवसेना यांच्यात श्रेयासाठी जी चढाओढ आणि एकमेकांवर कुरघोडी चालली आहे, ती विदारक आहे. तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्चून हे भव्य दिव्य असे शिवस्मारक उभे राहात असताना खरे तर सर्व जात – पात – धर्म – पक्ष भेद विसरून अवघ्या मराठी माणसाने एकत्र येणे अपेक्षित होते आणि तसे घडले असते तरच हे स्मारक खर्‍या अर्थाने मराठी अस्मितेचा मानबिंदू ठरले असते. परंतु येथे केवळ श्रेय आणि राजकीय फायदा उपटण्याची चढाओढच दिसून येते. ज्या प्रकारे सेना – भाजपात या विषयावरून लाथाळ्या चालल्या आहेत, त्या पाहिल्या तर हे स्मारक उभारण्यामागे शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे दर्शन जगाला घडविण्याची मनीषा आहे की स्वतःचे ढोल पिटण्याची हा प्रश्न पडतो. मुंबईत येत्या मार्चमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. सेना – भाजपामध्ये त्यावरून तणातणी सुरू आहे. हे शिवस्मारकही या राजकीय संघर्षात सापडले आहे. या स्मारकाची मूळ कल्पना ८० च्या दशकात मांडली गेली होती. नानाविध परवानग्यांचे जंजाळ पार करताना सरकारे बदलली. केंद्र आणि राज्यातील विविध संबंधित घटकांच्या जवळजवळ बारा परवानग्यांचे आव्हान पार करून हे स्मारक साकारते आहे. अंतिम परवानगी गेल्या फेब्रुवारीत मिळाली होती, परंतु महापालिका निवडणुका विचारात घेऊन भूमीपूजन लांबणीवर टाकले गेले अशीही माहिती समोर आली आहे. महापालिकेतील सेना – भाजपमधील सत्तासंघर्ष सर्वांना ठाऊकच आहे. शिवसेनेचे मुंबईवरील वर्चस्व महापालिका निवडणुकांत सतत दिसत आले आहे. मात्र, यावेळी भाजपाला ते चित्र बदलायचे आहे. त्यातून विकासकामांच्या श्रेयाची ही धडपड सुरू आहे आणि दुर्दैवाने शिवस्मारकासारखा स्वप्नवत स्वरूपाचा प्रकल्पही या राजकारणात अडकलेला आहे. मुळात एवढा प्रचंड खर्च करून या शिवस्मारकाची आवश्यकता आहे काय हा मुद्दा विचारणारेही आहेत. एकीकडे महाराजांच्या गडकिल्ल्यांची पडझड होऊन तो अभिमानास्पद वारसा मातीस मिळत असताना डोळे दिपवणारे हे स्मारक कशासाठी असाही सवाल काहीजण करतात. मच्छीमारांचा विरोध आहे, पर्यावरणवाद्यांचाही नेहमीप्रमाणे आहेच, परंतु एकदा हे स्मारक उभारायचे असा निर्णय पक्का झाल्यावर समस्त मराठी माणसाची एकजूट तरी त्यामागे दिसणे आवश्यक होते. इरादे नेक असते आणि राजकीय श्रेयाची चढाओढ नसती, तर सर्वांना सामावून घेऊन ते साकारता आले असते, परंतु येथे ‘आम्ही हे करतो आहोत’ हा भाव आणि राजकीय लाभाची गणितेच समोर असल्याने या स्मारकामागील कल्पनेलाच गालबोट लागले आहे. ‘सामना’ ने शनिवारी ‘शिवाजी महाराज भाजपच्या वेढ्यात’ असल्याची हाळी दिली, तर विनायक मेटे, राजू शेट्टींनीही विरोधात आरोळी ठोकली. अशा अविश्वासाच्या वातावरणात सत्तास्पर्धा, हेवेदेवे यांच्या गलबल्यातून साकारणार्‍या या शिवस्मारकातून आपण उद्या जगाला काय सांगणार आहोत? ज्याच्यासाठी बत्तीस मणांचे सिंहासन बनवले गेले होते, तो शिवाजी राजा सूती वस्त्रांनिशी लाकडी पलंगावर निजत असे. स्वतःच्या राज्याभिषेकावरील खर्चाची झळ रयतेला बसू नये म्हणून केवळ वतनदारांकडून ‘सिंहासनपट्टी’ वसूल करण्याचे आदेश त्याने दिले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या नावाने स्वतःचे कल्याण साधू पाहणार्‍यांना काय बरे म्हणायचे?