कविता कांदोळकरांसह समर्थकांची तृणमूल कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी

0
14

>> ४ सरपंच व उपसरपंचांसह १४ पंचांचा समावेश

गोवा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करीत राज्यात प्रवेश केलेल्या आणि निवडणूक लढवलेल्या तृणमूल कॉंग्रेसचे एक-एक नेते आता या पक्षाला सोडचिठ्ठी देऊ लागले असून, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष किरण कांदोळकर यांच्या पत्नी आणि पक्षातर्फे थिवीतून निवडणूक लढवलेल्या उमेदवार कविता कांदोळकर यांनी काल आपल्या समर्थकांसह पक्षाच्या राजीनामा दिला.

किरण कांदोळकर यांच्याबरोबरच थिवी, अस्नोडा, रेवोडा व कामुर्लीच्या सरपंचांसह चार उपसरपंच आणि १४ पंच सदस्यांनी देखील तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेस हा प्रभावहीन ठरल्याने पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी, अशी सूचना आपणाला आपले कार्यकर्ते व समर्थकांनी केल्याने आपण पक्षाचा राजीनामा दिल्याचे कविता कांदोळकर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, एका मागोमाग एक अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची पूर्णपणे फेररचना करण्याचा व हंगामी राज्य कार्यकारी समिती निवडण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.