कविताव्रती प्रा. शंकर वैद्य : काही संस्मरणे

0
699

– डॉ. सोमनाथ कोमरपंत
नुकतेच मंगळवार दि. २३ सप्टेंबर रोजी प्रा. शंकर वैद्यसर यांचे पहाटे ४.३० वा. निधन झाले. मराठी साहित्यसृष्टीतील मूर्तिमंत चैतन्य हरपले. ८६ वर्षांचे अभिरुचिसंपन्न आणि परिपूर्ण जीवन प्रा. वैद्यसर जगले. वाङ्‌मयीन संस्कृतीवर निस्सीम प्रेम करणारा त्यांच्यासारखा व्यासंगी प्राध्यापक आपल्यातून निघून जाणे ही क्लेशदायक बाब आहे. साहित्यसृष्टीतील एक एक दिग्गज निघून जाताना प्रा. वैद्यसरांनी लौकिक जगाचा निरोप घेतला. एक दिलदार माणूस म्हणून आणि जुनी पिढी- नवी पिढी यांमध्ये सौहार्दाचा सेतू निर्माण करणारा साहित्यिक म्हणून त्यांनी साहित्यजगतात तेजस्वी मुद्रा निर्माण केली. ते गेल्यानंतर सर्वांनाच दुःख झाले आहे हे जाणवते.
आत्मभान आणि समाजभान यांची तरफ त्यांनी सुजाण वृत्तीने सांभाळली. संयमाने आणि कुठेही गाजावाजा न करता. जनांत वावरून त्यांचे भावजीवन समृद्ध करणारा आणि मुंबईसारख्या अवाढव्य महानगरात राहूनही विजनात निरंतर साहित्यसाधना करणारा त्यांच्यासारखा माणूस दुर्मीळ. त्यांच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वाचा प्रत्येक पैलू पृथगात्म. गुणसंपन्न. बालपणापासून कवितेचा छंद जोपासत १९६० नंतरच्या कालखंडातील एक महत्त्वाचे कवी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. ‘पॉप्युलर प्रकाशन’च्या ‘नवे कवी… नवी कविता’ या मालिकेतील चौथा कवितासंग्रह प्रा. शंकर वैद्यांचा ‘कालस्वर’ १९७१ मध्ये काव्यरसिकांसमोर आला. त्याचे खूप कौतुक झाले. वाङ्‌मयीन नियतकालिकांनी या कवितेतील प्रगल्भ आत्मस्वराची आवर्जून दखल घेतली. यासंदर्भात व्यासंगी विचारवंत दुर्गा भागवत यांनी लिहिलेल्या परीक्षणाचा उल्लेख करावा लागेल. गतिमान कालप्रवाहाची अनेक रूपे, अनेक विभ्रम या कविमनाला विशेषत्वाने जाणवतात. कालाची प्रमाथी शक्ती आणि भावकोमल, संवेदनशील कविमन यांच्या अंतर्विरोधातून, संमिश्र जीवनानुभूतीतून त्याला नित्यनूतन धून ऐकू येते. मग जीवनाचे चिरंतन सत्य गवसते याचा प्रत्यय या कवितेतून येतो.
प्रेमानुभूतीचे उत्कट चित्रण हाही ‘कालस्वर’चा गुणविशेष. विलक्षण जिव्हाळा, आंतरिक प्रीतिभावनेचे विभ्रम आणि अंतिमतः प्रेमानुभवाला आलेले हृदयसंवादाचे रूप येथे आढळते. पूर्वसुरींचा प्रभाव आणि संस्कार झालेले हे कविमन. पण त्याचा परिणाम मात्र आपल्या अभिव्यक्तीवर या कवीने होऊ दिला नाही. छंदःशास्त्रावर विलक्षण प्रभुत्व अजूनही त्याने अभिव्यक्तीच्या निराळ्या वाटा धुंडाळल्या. प्रयोगशीलता आणि मांडणी यांबाबतीत तिची धाटणी निराळी. कविवर्य शंकर वैद्यांचे किती कवितासंग्रह प्रसिद्ध झाले यापेक्षा त्यांनी लक्षवेधी आणि गुणवत्तायुक्त कविता लिहिल्या हे जाणून घेणे महत्त्वाचे. जीवनदृष्टीतील ठामपणा आणि संयम हे त्यांचे गुण त्यांनी हाताळलेल्या सर्वच क्षेत्रांत दिसून येतात. ‘दर्शन’ हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर आला. पण या कालावधीत त्यांची कविता थांबली होती का? जीवनाचा मार्ग ती आक्रमीत होती. अनुभूतीची नवी वळणे आत्मसात करीतच होती. अध्यापनाच्या क्षेत्रात जुन्या कवींच्या अभ्यासाबरोबर नव्या कवींच्या कवितांचे वाचन होत राहिले. त्यांच्या पाठीवर थाप पडत राहिली. तिच्यात वरपांगीपणाचा लवलेश नव्हता. गुणग्राहकतेची मिती होती. उच्च अभिरुची आणि आस्वादक्षमता होती. त्यामुळे नव्या पिढीतील कवींचा त्यांच्याभोवती गराडा असे. विलक्षण स्मरणशक्तीची दैवदत्त देणगी त्यांना लाभलेली होती. अतिशय सुंदर असे त्यांचे हस्ताक्षर. अमोघ शब्दांची आणि प्रभावी वक्तृत्वाची त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मिळालेली जोड, डॉ. सरोजिनी वैद्य यांच्यासारख्या प्रगल्भ आणि चिंतनशील वृत्तीच्या सहधर्मचारिणीची दीर्घकाळ लाभलेली साथसंगत त्यांच्या साहित्यप्रवासाला पूरक ठरली.
विश्‍वी पावलोपावली
बीजे जन्मांची सांडली
पाय पाय टाकताना
त्यांची फुले उमलली
फुलाफुलांचा प्रवाह
न्हाते तेच एक मन
तुझा रंग माझा गंध
एका फुली ये फुलून
हा त्यांचा भावकोमल स्वर १९७१ पासून काव्यरसिकांच्या परिचयाचा.
काव्यनिर्मितीबरोबरच प्रा. वैद्यसर काव्यसमीक्षेत विशेष रमले. तिची रूपकळा आल्हाददायी आहे. तिच्यातून कविमनाचे प्रगल्भ आकलन, कवितेच्या अंतरंगात हळुवारपणे प्रवेश करून तिची बलस्थाने व सौंदर्यस्थळे अधोरेखित करणारी व्यासंगी वृत्ती, मांडणीतील साक्षेप दिसून येतो. त्यांची शब्दकळा चित्तवृत्ती प्रसन्न करणारी आहे. चिररुचिर आहे. सर्जनशील मन असल्यामुळे ते हे सारे करू शकले. प्रामुख्याने ‘सत्यकथा’ मासिकातून त्यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज, भा. रा. तांबे व इंदिरा संत या मराठीतील महत्त्वाच्या कवींवर प्रदीर्घ लेख लिहिले, ते या कवींच्या जीवनदृष्टीवर आणि काव्यसृष्टीवर नवा प्रकाश टाकणारे आहेत. कुसुमाग्रजांच्या प्रारंभीच्या ‘रसयात्रा’ आणि नंतरच्या ‘प्रवासी पक्षी’ या निवडक कवितांच्या संग्रहांना प्रा. वैद्यसरांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या. कविमानस आणि त्याने प्रतिभाबलावर निर्मिलेली सृष्टी समजून घेण्याच्या दृष्टीने या प्रस्तावना किती मौलिक आहेत हे वेगळे सांगायला नको. मनमोहनांची कविता आकलनाच्या चिमटीत पकडणे किती कठीण! त्यांचे कविमन पार्‍यासारखे. पण वैद्यसरांनी परिश्रमपूर्वक आणि योजकतेने हे सारे घडवून आणलेले आहे. समीक्षकांच्या दृष्टीने काहीसे उपेक्षित राहिलेले लोककवी मनमोहन त्यांच्या संकलनातून व प्रस्तावनेतून उलगडत जातात. कुशवसुतांचे द्रष्टेपण, सावरकरांच्या कवितेतील बद्धता आणि मुक्ती यांमधील अंतर्विरोध व त्यातून प्रज्ज्वलित झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व, इंदिरा संतांच्या कवितेतील विरहभावना, प्रेमाची असोशी व तिच्यातून उभे राहिलेले त्यांचे प्रतिमाविश्‍व प्रा. वैद्यसर नेमकेपणाने व नीटस शब्दांत मांडतात. ‘बालकवींच्या कवितेतील हा, ही, हे’ हा त्यांचा लेख त्यांच्या संशोधक वृत्तीवर प्रकाश टाकणारा आहे. कविता हा त्यांचा मर्मबंध आहे हे लक्षात येते.
ते उत्कृष्ट कथाकारही आहेत. ‘मौज प्रकाशना’ने प्रसिद्ध केलेल्या ‘आला क्षण… गेला क्षण’ हे त्यांच्या कथासंग्रहाने दाखवून दिलेले आहे.
त्यांचे संस्मरणाच्या अंगाने फुलत गेलेले लेख वाचनीय आहेत. लालित्याचे सर्व गुण त्यांत प्रकट झालेले आहेत. ‘इस्माईल युसुफ महाविद्यालया’त ते दीर्घकाळ मराठीचे अध्यापन करीत होते. मराठीतील नामवंत कथाकार प्रा. के. ज. पुरोहित (शांताराम) त्या काळात तिथे प्राचार्य म्हणून धुरा सांभाळत होते. तत्कालीन मंतरलेल्या दिवसांच्या आल्हाददायी आठवणी प्रा. वैद्यसरांनी ‘इस्माईल युसुफ कॉलेजचे दिवस’ या ‘ललित’मधील अप्रतिम लेखात लिहिलेल्या होत्या. त्यांचा स्वभाव गोष्टीवेल्हाळ. आयुष्यात साहित्यविश्‍वातील त्याचप्रमाणे जीवन समृद्ध करणार्‍या अन्य क्षेत्रांतील मोठी माणसे त्यांनी जवळून पाहिली होती. या मानदंडांकडे त्यांनी आदराने आणि ममत्वाने पाहिले. विश्रब्ध गप्पागोष्टींतून त्यांना हे सारे प्रकट करावेसे वाटे. त्यांच्या तोंडून हे सारे ऐकणे हा एक आनंदानुभव असायचा. प्रबोधन व्हायचे. वृत्तिगांभीर्याबरोबर त्यांची नर्मविनोदी वृत्ती प्रकट व्हायची. कवी सोपानदेव चौधरींवर ‘ललित’मध्ये लिहिलेला लेख या दृष्टीने वाचायला हवा.
गोमंतभूमीशी त्यांचे ऋणानुबंधाचे नाते जडलेले होते. मुंबईची ‘गोवा हिंदु असोशिएशन’, मडगावची ‘गोमंत विद्या निकेतन’ व ‘स्नेहमंदिर’ आणि ‘गोमंतक मराठी अकादमी’ या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी ते कायमचे जोडले गेले होते. प्रभावी व व्यासंगी वक्ते या दृष्टीने त्यांच्या कितीतरी गाठीभेटी अनेकांशी झालेल्या आहेत. त्यांचे बंधू गो. वि. वैद्य ‘पत्रसूचना कार्यालया’ची धुरा सांभाळत होते. गेल्या अर्धशतकापासून गोमंतकातील शैक्षणिक क्षेत्रात, वाङ्‌मयीन विश्‍वात महत्त्वाची कामगिरी करून ज्यांनी नावलौकिक मिळविला ते प्राचार्य गोपाळराव मयेकर आणि प्रा. एस. एस. नाडकर्णी हे त्यांचे आवडते विद्यार्थी. या दोघांबद्दल त्यांना ममत्व वाटायचे. त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटायचा. त्यांचे कित्येक विद्यार्थी पुणे, मुंबई व इतरत्र विविध क्षेत्रांत चमकले. फोंड्याला असताना नरेंद्र बोडके यांच्याकडून १९७१ मध्ये प्रा. वैद्यसरांचा गौरवाने उल्लेख झाल्याचे आठवते. ‘चौगुले महाविद्यालया’त बी.ए.च्या वर्गात असताना कुसुमाग्रजांचा ‘विशाखा’ हा कवितासंग्रह अभ्यासासाठी लावला होता. डॉ. वडेरसरांनी ‘रसयात्रा‘ची प्रस्तावना आवर्जून अभ्यासायला लावली. ती पथदर्शक तर ठरलीच; शिवाय जीवनभराचा आनंदाचा ठेवा ठरली. पण प्रत्यक्षात त्यांना भेटण्याचा प्रथम योग आला तो १९८० साली डिचोली येथे शिवाजी मैदानावर पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या १६ व्या ‘गोमंतक मराठी साहित्यसंमेलना’त. येथील कविसंमेलनात त्यांनी ‘आम्ही पालखीचे भोई’ ही कविता सादर केली होती. कवितावाचन तन्मयतेने कसे करावे याचा तो आदर्श वस्तुपाठ होता. तरुणमंडळीशी हृदयसंवाद साधताना त्यांना मुळीच संकोच वाटत नव्हता. मुक्त मनाने ते आम्हा सर्वांशी बोलले. आम्ही सारे कोंडाळे करून त्यांच्याभोवती बसलो होतो. तेव्हापासून गोवा, पुणे आणि मुंबई येथे प्रा. वैद्यसर वाङ्‌मयीन उपक्रमांच्या निमित्ताने भेटत गेले. नुसते भेटले नाहीत तर ‘फिलोसॉफर ऍण्ड गाईड’च्या स्वरूपात भेटले. दरवेळेला त्यांच्याविषयीचा आदरभाव द्विगुणित होत गेला. प्राचार्य मयेकरसर आणि प्रा. नाडकर्णीसर यांच्याकडून त्यांच्या निधनाची वार्ता कळली तेव्हा मागचा आठवणींचा पट डोळ्यांंसमोरून सरकून गेला. मन विषण्ण झाले. त्यांचे निकटचे स्नेही ज्येष्ठ समाजसेवक रामकृष्णबाब नायक यांनी त्यांना ‘स्नेहमंदिर’मध्ये बोलावून घेतले होते. डॉ. अजय वैद्य यांनी ‘छंदःशास्त्रा’विषयी प्रा. वैद्यसरांची मुलाखत घेतली होती. प्रा. नाडकर्णीसर व मी त्यावेळी उपस्थित होतो. प्रा. वैद्यसरांचा संतकाव्य, पंडिती काव्य, आधुनिक मराठी कविता आणि नवकविता यांविषयीचा सखोल अभ्यास, छंदःशास्त्रीय मांडणी करताना त्यांनी उद्धृत केलेली असंख्य उदाहरणे, संस्कृत आर्ष महाकाव्ये, विदग्ध महाकाव्ये यांचे अधूनमधून येणारे संदर्भ यांमुळे प्रकट झाला. सकाळपासून दुपारपर्यंत चाललेल्या या वाग्यज्ञामुळे आही सारे तृप्त झालो. त्यांच्या स्मरणशक्तीबद्दल विस्मयही वाटला. १२ ऑक्टोबर २००९ ची ती सकाळ संस्मरणीय झाली. तीच त्यांची शेवटची भेट ठरली. डॉ. सरोजिनीबाई गेल्यापासून त्यांचा आधारच नाहीसा झाला होता. त्यानंतर तीनचार वेळा झालेला दूरध्वनीवरील संवाद. आता तर सारेच संपले….
छंदःशास्त्राच्या उपयुक्ततेबद्दल ते जे काही बोलले होते ते आधुनिक कवितेलाही पोषक ठरणारे होते. त्यांतील काही विचार आजही स्मरतात ः
सुरुवातीला प्रा. वैद्यसरांनी अक्षरगणवृत्ते आणि अक्षरमात्रा यांविषयी विवेचन केले होते. नंतर ते म्हणाले, ‘‘आम्ही त्या माध्यमाशी किती एकरूप होतो हे महत्त्वाचे… तुम्ही इतरांचे किती वाचले आहे हे महत्त्वाचे…. सर्जनशील कवी मनाने हुशार असावा लागतो… छंदोरचना हे विशाल विश्‍व आहे… कवीला तालाचे ज्ञान असावे लागते… हृदयाचे स्पंदन हे तालाशी संबंधित असते. उदा. लहान मुलाचा हुंदका. एकेका अक्षराने, एकेक मात्रा कमी करण्याने चित्र बदलते.’’
‘‘कविमनाला झालेल्या जाणिवेचे चित्र कवितेत उमटते ः
हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा, डळमळु दे तारे!
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याने
ढळू दे दिशाकोन सारे!’’
(कोलंबसाचे गर्वगीत)
‘‘वृत्त सोडून छंदांतही रचना केल्या गेल्या आहेत. ‘श्‍लोक’ ही संकल्पना संस्कृतमधून आलेली आहे. श्‍लोक हा मात्रावृत्तात नसून अक्षरगणवृत्तात्मक असतो. द्विपदी, चतुष्पदी, षट्‌पदी, अष्टपदी आणि दशपदी. उदा. अनिलांनी रूढ केलेली ती ‘दशपदी.’’’
‘‘उत्स्फूर्त कविता आणि बेतलेली कविता असे दोन प्रकार असतात. एखाद्या विषयाशी तुम्ही किती तन्मय होता ते महत्त्वाचे. तुम्ही काय लिहिता? लय त्यावेळी भिनली जाते का? वातावरणनिर्मिती होते का?’’
रसनिर्मितीच्या संदर्भात बोलताना प्रा. वैद्यसर म्हणाले, ‘‘‘रस’ ही संकल्पना भरतमुनींपासून रूढ आहे. साहित्यशास्त्रात ती पुनःपुन्हा उच्चारली जाते. भरतमुनी, क्षेमेंद्र, कुंतक, अभिनवगुप्त आणि रुद्रट इत्यादी विमर्शकांनी विविध प्रकारचे चिंतन केले आहे. रस ही कल्पना काव्यगत नसून रसिकगत आहे. रसचर्चा होतच राहणार आहे. आधुनिकतेशी तिचे नाते जोडता आले पाहिजे. संस्कृत अभिजात वाङ्‌मयात नाटककाराला ‘कवी’च म्हणत असत.’’
त्यानंतर त्यांनी अलंकारांविषयी आपले विचार मांडले, ‘‘भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी अलंकारांची योजना केली जाते. आधुनिक काळातील परिवर्तनामुळे अलंकारांवर गदा आलेली आहे. कालानुरूप नव्या जाणिवा आणि नव्या प्रतिमा निर्माण होणे ही आवश्यक बाब. जुने मोडून काढण्यासाठी प्रायोगिकता आलेली आहे. एक बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे ः नाटकात पुन्हा परंपरेकडे जाणे सुरू झालेले आहे. कवितादेखील पुन्हा जुन्या वळणाकडे जाणार आहे.’’
प्रा. शंकर वैद्यसरांच्या या विचार प्रतिपादनातून जाणवले ते असे ः त्यांच्या वृत्तीतला समतोल व अनाग्रही स्वभाव त्यांनी कधी सोडला नाही. परंपरेतील सत्त्वशीलतेचा कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश न बाळगता बदलत्या काळातील कवितेशी कुठे सांधा जुळविता येईल याचा त्यांनी चिंतनशील वृत्तीने वेध घेतला होता. आयुष्यात बोधवादी दृष्टिकोन त्यांनी कधी बाळगला नाही.
प्रा. शंकर वैद्यसरांच्या विलोभनीय व्यक्तिमत्त्वातील कोणता पैलू अधोरेखित करावा? आयुष्यात त्यांनी सर्व क्षेत्रांत सेतू बांधले. मित्र जोडले. त्यांच्या सौहार्दाचे चांदणे महाराष्ट्रात, बृहन्महाराष्ट्रात, गोव्यात, कर्नाटकात आणि सर्वदूर प्रदेशांत पसरलेले आहे. त्याचा थेंब थेंब प्राशन करावा. वास्तवाचे भान ठेवून सशक्त सौंदर्यवादी काव्यधारेची उपासना करणार्‍या या कवीची कविता वाचावी. तिच्यातील प्रतिभाविश्‍व न्याहाळावे.
लाटांवर लाट भरती वाढत चाललेली
या सागरतळाशी मी
गुडुप अंधारात
पाण्याचा क्रूर पर्वत माझ्यावर लोळणारा
हे वास्तव प्रा. वैद्यसर कवी म्हणून नाकारत नाही. पण त्यांच्या दृष्टीने हेही खरेच ः
बीज अंकुरते कसे
नाजुकल्या वेदनांनी
मुळे पृथ्वीच्या धमन्या
होता वृक्ष ये फुलोनी-
लागे मातीच्या ईर्ष्येला
नव्या जन्माचा डोहाळा
तिचा जीव वृक्षातून
रंगगंधांत व्यक्तला
पार्थिव देह सोडून प्रा. वैद्यसर निघून गेले आहेत, पण त्यांच्या कवितेचा हा रंगगंध अम्लान राहणार आहे. सर्वार्थाने ‘गुरुणां गुरू’ असलेल्या प्रा. वैद्यसरांना विनम्र श्रद्धांजली!