कळसा – भांडुरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विविधांगी प्रयत्न

0
10

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे प्रतिपादन

आम्ही कळसा-भांडुरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करत आहोत अशी माहिती काल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकमधील शेतकऱ्यांना दिली. कर्नाटकातील शेतकऱ्यांनी काल जोशी यांच्या हुबळी येथील निवासस्थानावर मोर्चा नेऊन कळसा भांडुरा प्रकल्पाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी वन दाखले व पर्यावरणीय मंजुरी लवकर मिळावी अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना मंत्री जोशी यांनी, वरील माहिती शेतकऱ्यांना दिली.

गोव्यामध्ये व्याघ्र आरक्षण क्षेत्राची स्थापना करण्याचा जो प्रस्ताव आहे तसेच सर्वोच्च न्यायालयात अन्य मुद्द्यांसंबंधी असलेला खटला यामुळे कळसा-भांडुरा प्रखल्प मार्गी लागण्याच्या कामी अडथळे निर्माण झाले आहेत असे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले.

भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जललवादाने दिलेल्या निवाड्यासंबंधी अधिसूचना काढली होती. आणि डीजीआरला मंजुरी दिली होती. याचीआठवण त्यांनी शेतकऱ्यांना करून दिली. मात्र नंतर राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना झाल्यानंतर कडक कायदे आले. गोव्याने व्याघ्र आरक्षण क्षेत्राचा मुद्दाही उपस्थित केला आहे. त्याशिवाय कर्नाटक राज्य वन्यजीव मंडळानेही मंजुरी देऊन ती केंद्र सरकारकडे पाठवायला हवी. मात्र तसे झालेले नाही असे जोशी यांनी पुढे सांगितले.
नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हा एक महत्त्वाचा मुद्दा बनवण्यात आला होता. म्हादई प्रकरणी आपण गोवा तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती असे जोशी यांनी सांगितले.