म्हादईप्रश्नी कर्नाटक सरकारचे न्यायालयाबाहेर सामोपचाराने प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र भांडखोर गोव्याकडून याबाबतीत निराशाजनक प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे ग्रामीण विकासमंत्री एच. के. पाटील यानी काल येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. या प्रश्नी येथे चालू असलेले आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.
बेळगाव, धारवाड व गदग या जिल्ह्यांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी कळसा-भंडुरी प्रकल्प कर्नाटक सरकारने हाती घेतला आहे. त्यासाठी आम्हाला म्हादई नदीचे ७.५६ टीएमसी एवढेच पाणी मलप्रभा नदीत वळवायचे आहे, असे पाटील म्हणाले.
म्हादई लवादाबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रातील एनडीए सरकार व गोवा सरकारकडूनही याबाबत कोणतेही सहकार्य मिळत नाही असे ते म्हणाले.