कळंगुट, कांदोळी बाह्य विकास आराखड्याला येत्या तीन ते साडे तीन महिन्यात अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. कळंगुट व कांदोळी या कोमुदानिदादीच्या सुमारे आठ लाख चौरस मीटर जमिनीत विविध नवीन सार्वजनिक प्रकल्प उभारण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. कळंगुट आरोग्य केंद्राच्या नियोजित जागेतील ५४ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली जाणार आहेत, अशी माहिती उत्तर गोवा नगरनियोजन व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा उपसभापती मायकल लोबो यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
कळंगुट, कांदोळी येथील बाह्य विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही पंचायत क्षेत्रातील सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य यांची बैठक काल घेण्यात आली. या बैठकीत बाह्य विकास आराखड्याची सविस्तर माहिती लोकप्रतिनिधीना देण्यात आली आहे. या दोन्ही पंचायत क्षेत्रात प्रभागनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा स्थानिक लोकांपर्यत नेऊन त्यांच्या सूचना, तक्रारी जाणून घेण्याची सूचना स्थानिक लोकप्रतिनिधीना करण्यात आली आहे. अंतिम बाह्य आराखडा निश्चित करून मान्यतेसाठी नगरनियोजन मंडळाकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष लोबो यांनी दिली.
पारदर्शकता ठेवून
ओडीपी आराखडा
या आराखड्याबाबत नागिरकांच्या सूचना, आक्षेप स्वीकारले जात आहेत. ओडीपीबाबत नागरिकांनी साठ दिवसात तक्रारी, सूचना सादर कराव्यात. या तक्रारीची योग्य दखल घेतली जाईल. बाह्य विकास आराखडा तयार करताना पूर्ण पारदर्शकता बाळगली जाणार आहे. बाह्य विकास आराखड्याच्या कच्च्या मसुद्यावर नवीन बांधकामाना परवानगी देऊ नये. बाह्य विकास आराखड्याला अंतिम स्वरूप देऊन बांधकामांना परवाने देण्याची सूचना न्यायालयाने केली आहे, असेही लोबो यांनी सांगितले. जमीन मालकाने स्वतःच्या जागेत केलेले बेकायदा बांधकाम कायदेशीर केले जाणार आहे. एखाद्या नागरिकाच्या बांधकामाची नोंदणी कच्च्या ओडीपीमध्ये झालेली नसल्यास नोंदणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. किनारी भागात दहा पंधरा वर्षापूर्वी विकासासाठी नियोजन करायला हवे होते. सध्या उपलब्ध असलेल्या जागेत नागरिक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी नवीन साधन सुविधा निर्माण करण्यासाठी नियोजन केले जात आहे.
विविध साधनसुविधांसाठी जागा आरक्षित
या दोन्ही भागाच्या नियोजित विकासासाठी प्रथम जमीन वापर आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याच्या आधारे कच्चा ओडीपी आराखडा तयार करण्यात आला आहे. पंचायतीकडे नोंदणी असलेली घरे, विस्तारीत घरे, रेस्टॉरंट, गेस्ट हाऊस यांची नोंदणी करण्यात आली असून कायदेशीर मान्यता दिली जाणार आहे. तसेच या भागात नवीन बालोद्यान, मलनिस्सारण प्रकल्प,कचरा प्रकल्प, ऍनिमल होम, क्रीडा मैदाने, बहुउद्देशीय मार्केट संकुल, आरोग्य केंद्र, सामाजिक सभागृह, वाहतूक झोन, बहुउद्देशीय पार्कीग प्रकल्प, वीज उपकेंद्र, इनडोअर स्टेडियम, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र यांच्यासाठी जागा राखीव करून ठेवण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ऑचर्ड, शेत जमीन राखून ठेवावी लागली आहे, असेही लोबो यांनी सांगितले. सिकेरी ते बागा दरम्यान जुना रस्त्याचा विस्तार केल्यास अनेक समस्या निर्माण होणार असल्याने नवीन रस्ता २५ मीटरच्या रस्त्यासाठी जागा राखीव करण्यात आली आहे. तसेच जुना २५ मीटर रस्ताची रूंदी १५ मीटरवर आणण्यात आली आहे. त्यात फूटपाथ, पार्कीगची सोय केली जात आहे. हडफडे, नागोवा, पर्रा हे भाग पर्यटन हब म्हणून विकसित होत आहेत. या गावाच्या नियोजित विकासासाठी प्राधान्यक्रम दिला जात आहे, असेही लोबो यांनी सांगितले.