कळंगुट व कांदोळीचा बाह्यविकास आराखडा मंजूर

0
98

पणजी (प्रतिनिधी)
नगर नियोजन मंडळाच्या (टीसीपी) काल पर्वरी येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत कळंगुट व कांदोळी बाह्यविकास आराखड्याला (ओडीपी) मान्यता देण्यात आली आहे. नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी इको टूरिझम धोरण जाहीर केले आहे.
नगर नियोजन मंडळाची दोनदा स्थगित करण्यात आलेली बैठक काल तातडीने घेण्यात आली. कांदोळी येथील ग्रामस्थांकडून ओडीपीला विरोध केला जात आहे. याबाबत संबंधितांना निवेदन सादर करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक कांदोळी भाग ओडीपीमधून वगळण्याची मागणी करीत आहेत. तथापि, मंडळाच्या बैठकीत कळंगुट व कांदोळी ओडीपीला मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात इको टुरिझमला चालना देण्यासाठी धोरण जाहीर करण्यात आले आहे. ऍग्री टुरिझमसाठी कृषी कार्डची सक्ती करण्यात आली आहे. २० हजार चौरस मीटरसाठी ५ टक्के एफएआर दिला जाणार आहे. किनारी आणि हिंटरलँडमध्ये टुरिझमला चालना दिली जाणार आहे, अशी माहिती मंत्री सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यातील २ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या व्यापारी इमारती आणि हॉटेल्सना १ जानेवारीपासून हरित बनविण्याची सक्ती केली जाणार आहे. इमारतीचे बांधकाम करताना निश्‍चित मार्गदर्शक तत्त्वांचे बंधन लागू करण्यात येणार आहे, असे मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.
या बैठकीत मडगाव, फोंडा, बागा, हडफडे, आणि ताळगाव येथील जमीन वापर नकाशे विचारात घेण्यात आले.