कळंगुट कॉंग्रेस समितीच्या सदस्यांचे राजीनामासत्र

0
14

>> लोबोंना पक्षात घेतल्याचे तीव्र पडसाद

भाजपचा त्याग केलेले आणि प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातील बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांना कॉंगे्रस पक्षात प्रवेश दिल्याचे पडसाद काल उमटलेे. काल कळंगुट येथील कॉंग्रेस गटाने मायकल लोबो यांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आल्याच्या निषेधार्थ आपल्या पदांचे राजीनामे दिले. तसेच राज्यात ‘कॉंग्रेस हटाव गोवा बचाव’ मोहीम सुरू करण्याची प्रतिज्ञा केली.
कळंगुट गट कॉंगे्रसमधील पदाधिकार्‍यांनी काल राजीनामा दिले. राजीनामे दिलेल्यांमध्ये माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, बेनेडिक्ट डिसोझा, जोजेफ सिल्वेरा आदी नेत्यांचा समावेश आहे.

भाजप सोडून आलेल्या मायकल लोबो यांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश देताना कॉंग्रेस गट समितीला विश्‍वासात घेतले नसल्याचे काल कळंगुट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आग्नेल फर्नांडिस, बेनेडिल्ट डिसोझा व जोजेफ सिल्वेरा या नेत्यांनी सांगितले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात छुपा करार झालेला असून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येणारे आमदार भाजपच्या स्वाधीन करणे असा हा करार असल्याचा आरोप वरील नेत्यांनी केला. आमच्यापैकी कुणी तरी एक पक्षाविरुद्ध निवडणूक लढवेल. अन्यथा कुठल्या तरी दुसर्‍या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ, असे यावेळी या नेत्यांनी स्पष्ट केले.