>> प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल; बागा, सिकेरी भागांतही कारवाई
कळंगुट, बागा, सिकेरी व कांदोळी या कळंगुट स्थानकाच्या हद्दीतील समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांना टाऊट्सकडून त्रास देण्याचे प्रकार वाढले आहेत. वेळोवेळी पोलिसांकडून टाऊट्सचा बेकायदा व्यवसाय करणाऱ्या या दलालांची पोलिसांकडून धरपकड केली जात होती, तरीही कळंगुट समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात या दलालांचा व्यवसाय सुरू होता. त्यामुळे पोलिसांनी काल एकूण 25 जणांना पकडत त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट समुद्रकिनारी नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना या टाऊट्सकडून त्रास होऊ नये, यासाठी कळंगुट पोलीस निरीक्षक परेश नाईक व पर्यटक पोलीस निरीक्षक जतिन पोतदार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पोलीस स्थानकांच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम हाती राबविली.
गोव्यात भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये कळंगुट हे सुरक्षित आणि आनंददायी ठिकाण असल्याची भावना निर्माण व्हावी. तसेच नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाला बाधा आणणाऱ्या घटना रोखण्यासाठी आणि टाऊट्सच्या उपद्रवांना आळा घालण्यासह कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून ही मोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेंतर्गत एकूण 25 टाऊट्स दलालांना पकडण्यात आले. चौकशी करून या दलालांना पोलिसांनी पर्यटन खात्याच्या संचालकांसमोर त्यांना हजर केले. पर्यटन कायद्यानुसार या टाऊट्सकडून प्रत्येकी 5 हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
गोव्यातील विविध किनाऱ्यांवर टाऊट्सची दहशत बरीच वाढलेली आहे. त्यांच्या उपद्रवाचा त्रास नववर्ष स्वागत व पर्यटनासाठी राज्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना सहन करावा लागत आहे. कळंगुट, बागा, सिकेरी व कांदोळी या किनाऱ्यांवरच नव्हे, तर अन्य किनाऱ्यांवरही या टाऊट्सचा वावर सुरू आहे. या कारवाईमुळे टाऊट्सच्या सतावणुकीतून पर्यटकांची काही प्रमाणात सुटका होणार आहे.