>> सरत्या वर्षाला गालबोट; जेवणाची ऑर्डर नाकारल्याने वाद
कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील एका शॅकमध्ये सोमवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास पर्यटकांच्या एका गटाला मारहाण करण्याची घटना घडली, त्यात आंध्रप्रदेशमधील एका 28 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला. भोलारवी तेजा असे मृत पर्यटकाचे नाव आहे. या खून प्रकरणी शॅकमालक आग्नेल सिल्वेरा (64), त्यांचा मुलगा शूबर्ट सिल्वेरा (23) आणि कर्मचारी अनिल बिस्ता (24) व कमल सुनार (23) या चौघांना पोलिसांनी अटक केली.
कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंधप्रदेशमधील 8 पर्यटक गोव्यात नववर्ष स्वागतासाठी आले होते. पर्यटनानंतर ते सर्वजण कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील ‘मरिना’ नामक शॅकवर रात्रीच्या जेवणासाठी आले होते. सुरुवातीला तिथे त्यांनी काही पदार्थ जेवणासाठी मागवले. यानंतर त्या पर्यटकांना आणखी जेवण हवे होते; मात्र शॅकमधील कर्मचाऱ्यांनी किचन बंद झाल्याचे सांगताच पर्यटक व शॅकमधील कर्मचाऱ्यांत यावरून वादावादी झाली. त्यानंतर शॅकमालक, त्यांचा मुलगा व कर्मचाऱ्यांनी मिळून पर्यटकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात भोलारवी तेजा ह्या पर्यटकाच्या डोक्यावर दंडुक्याने वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी त्याचा मित्र स्पंदन बोलू याने कळंगुट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला.
भोलारवी तेजा याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठवण्यात आला असून, त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. त्यानंतर आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.