कळंगुटमधील 11 डान्स बारना ठोकले टाळे

0
19

>> उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानंतर राज्य प्रशासनाने कळंगुटमधील 11 डान्स बार काल बंद केले.
गोवा खंडपीठाने बेकायदा डान्स बार बंद करण्याचा आदेश प्रशासनाला दिला होता. तसेच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बेकायदा डान्स बारवर कारवाई करण्याचा इशारा गुरुवारी दिला होता.

काल बार्देशच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केली. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसा आदेश जारी केला होता. त्यानंतर बार्देशच्या 7 मामलेदारांच्या उपस्थितीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने कळंगुटमधील वादग्रस्त ‘मैफल’सह 11 डान्स बारना टाळे ठोकले.
कळंगुट परिसरात काही ठिकाणी बार अँड रेस्टॉरंटच्या आड तर, काही ठिकाणी खासगी बांधकामात बेकायदेशीर डान्स बार सुरू आहेत, अशी जनहित याचिका खंडपीठात दाखल झाली होती. यावर झालेल्या सुनावणीवेळी पाहणी करून परवाने नसलेले डान्स बार तत्काळ बंद करा, असा आदेश खंडपीठाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते.

खंडपीठाच्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी, मामलेदार व पोलीस पथकांनी संयुक्त मोहीम राबवत डान्स बारची पाहणी केली. त्यानंतर 11 डान्स बार बंद करण्यात आले. बंद केलेल्या डान्सबारमध्ये पॉश नॉश, डेव्हिल्स, कूडा मुफसा, मैफल, थ्री किंग्ज, नेक्स्ट लिव्हर, नॉर्मस पब, ब्लॅक हार्ट, 39 स्टेप्स, ट्रॉपिकल लॉग्ज, प्लॅनिटेन लाइफचा समावेश आहे.