कळंगुटमध्ये डान्सबार व मसाज पार्लरना पंचायतीने बेकायदेशीररीत्या परवाने दिलेले असून याविषयी चौकशी केल्यास वेगवेगळ्या सरपंच किंवा उपसरपंचांची नावे सांगून संबंधित आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी काल पत्रकारांशी बोलताना केला.श्री. लोबो म्हणाले की, कळंगुट पंचायत छोट्याशा जागेत दुकान परवान्यासाठी दीड लाखांपर्यंत पैसे वसूल करते. कळंगुट किनारी भागातील बेकायदा डान्सबार तसेच मसाज पार्लरना परवान्यांसाठी मोठी रक्कम उकळली जाते. याबाबत उपजिल्हाधिकारी, मामलेदार, गटविकास अधिकारी यांच्याशी चौकशी केल्यास एवढे पैसे आवश्यक नसल्याचे ते स्पष्टीकरण देत असल्याने परवाने देताना भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही लोबो यांनी केला.
ग्रामसभेत डान्सबार आणि मसाज पार्लर बंद करण्याविषयी ग्रामस्थांनी आवाज उठवल्यास बंद करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात ग्रामसभेच्या ठरावाला केराची टोपली दाखवली जाते. या प्रकारामुळे पंचायतही या अनैतिक व्यवहारांना पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट होत असून डान्सबार व मसाज पार्लर मालकांकडून मलिदा उकळीत असल्याचा आरोपही आमदार लोबो यांनी यावेळी केला. कळंगुट किनारी भागात अनैतिक व्यवहार फोफावले असून त्यांचे उच्चाटन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. मात्र, पंचायत क्षेत्रातील युवक व ग्रामस्थांनीही या वाईट गोष्टी बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही मायकल लोबो यांनी केले.