कल्पना

0
23
  • – प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

दूषणांनी आणि आरोपांनी हतबल, नाउमेद, निरुत्साही न होता त्याची शक्ती, हुरूप आणि उत्साह वाढत जायला हवा. ललित लेखनाचे उद्दिष्ट कल्पना-साहित्याने साध्य करायला हवे. काल्पनिक साहित्यालाच जर आपण पदोपदी अडवता तर उत्कृष्ट साहित्यिक कसा बरे निर्माण होईल?

सत्य घटना आणि काल्पनिक घटना यांमध्ये अंतर असते. सत्य घटना या आपल्यासमोर मागच्या काळात किंवा आजच्या काळात घडलेल्या असतात. काल्पनिक घटनांना आपण प्रत्यक्षातल्या घटनांचा आधार देतो. जे आज घडतेय, अशीच आपण कल्पना करत असतो. घडलेल्या घटनांचे अनुकरण आपण कल्पनेमध्ये करत असतो.

साहित्यामध्ये लिहिताना आपल्याला कल्पनाविलासाचा आधार घ्यावा लागतो. सत्य घटना घडलेली तशाच तशी नाटकात, सिनेमात किंवा कथेत आपल्याला आणता येत नाही. नावे बदलावी लागतात, प्रसंग बदलावे लागतात व वातावरण तसेच परिवेष बदलावा लागतो. कारण आपली बदनामी झाली म्हणून दावे अथवा प्रतिदावे करीत कित्येक खटले लिहिणार्‍याविरुद्ध कोर्टात उभे राहू शकतात. ज्यांनी सत्य परिस्थिती आपल्या धडाकेबाज शैलीत मांडली, त्यांना अशाच कठीण संकटांना तोंड द्यावे लागले आहे. दोषी असूनदेखील पैशाच्या जोरावर अब्रू-नुकसानीचे पुरावे सादर करून कोर्टामध्ये केस जिंकलेल्यांचीही कित्येक प्रकरणे आपण आजपर्यंत पाहिली आहेत. लेखक बिचारा येथे नेहमीच दुबळा पडला आहे.

काही मालिकांमध्ये, नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये, कादंबरीमध्ये, कथांमध्ये लेखकाने अगोदरच सावधगिरीचा पवित्रा घेतलेला असतो. ‘या रचनेतील सगळ्या घटना व पात्रे काल्पनिक आहेत. एखादे वेळी जर कुणासाठी ती जुळत असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा. येथे लेखकाचा प्रामाणिक कलाविष्कार आहे हे आपण समजून घ्यावे. लेखकाचा उद्देश्य कोणाचीच बदनामी करण्याचा नाही हे कृपया लक्षात घ्यावे.’
वर्तमानपत्रातील लेख हे बहुतेक निबंधात्मक, विवेचनात्मक व विचारात्मक असतात. येथे संपादक, प्रकाशक, व्यवस्थापक व मालक सूचनात्मक टिप्पणी अधोरेखित करतात. ‘या वर्तमानपत्रात प्रकाशित व प्रसिद्ध झालेले विचार हे त्या-त्या लेखकाचे आहेत. वर्तमानपत्राचे व्यवस्थापक त्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. म्हणून संपूर्ण जबाबदारी त्या-त्या लेखकांची आहे आणि हे वर्तमानपत्र त्याला जबाबदार नाही.’
या आवाहनामुळे आपली बदनामी वर्तमानपत्राने केली म्हणून आपण वर्तमानपत्राच्या संपादकावर खटला दाखल करू शकत नाही. ज्यांनी आपल्यावर उघडपणे नावे घेऊन लिहिले त्याविरुद्ध आपण लढा देऊ शकता. त्याचे विविध मार्ग आपल्याला उपलब्ध आहेत.

स्पष्टपणे, परखड व कटू सत्य सांगणार्‍याविरुद्ध समाज कंपू करून बंड उभारतो. त्याच्या प्रगतीची सारी दारे बंद करतो. पुरावे न ठेवता शांतपणे व गुप्तपणे सूड घेतो, आणि प्रामाणिक माणसाला जीवनातून उठवतो. एवढे सगळे करून आपण सभ्य माणसे आहोत हे ढोंग उत्तमपणे वठवतो. मारणारी व खून करणारी माणसे हीच आणि अत्यंवधीसाठी एकत्र येऊन रडण्याचे प्रदर्शन करणारी माणसेही हीच, अशी विसंगती आपण खूपदा पाहिलेली आहे. निंदा-नालस्ती करणे, वाळीत टाकणे, बहिष्कार घालणे, हेतुपुरस्सर अपमान करणे, भीती घालणे, नोकरीतून काढून टाकण्याच्या खटपटी करणे, व्यवसाय असेल तर तो बंद पाडणे अथवा नुकसानीत नेणे, नातेवाइकांकडे खोट्या चहाड्या करणे, विविध आरोप ठेवणे असे वेगवेगळे चाळे करण्याची त्यांना सवयच झालेली असते.
हितशत्रू अंगावर चढवणे अथवा नात्यातल्याच माणसांना फूस लावून फितुरीने घरातच तंटा निर्माण करणे, पोलीस केस करण्याचा सल्ला देणे आणि आपले अंग न दाखवता नांदत्या घराचा बट्‌ट्याबोळ घडवून आणणे इथपर्यंत आजच्या या दुर्जन मनोवृत्तीची मजल गेली आहे.

सुपारी देऊन गुंडांकडून मरेपर्यंत बडवणे आणि कित्येक महत्त्वाचे अवयव निकामी करणे असले प्रकारदेखील घडलेले आपण वर्तमानपत्रांमधून वाचले असतीलच.
राजकारणामध्ये जिंकण्याच्या खुमारीने माणूस कोणती हद्द ओलांडणार याचा अंदाजच घेता येत नाही. सत्य आणि असत्य राजकारण हा संघर्ष आज शिगेला पोहोचलेला आहे. मनाच्या पावित्र्याने जो निर्मळ राजकारण करतो त्याला वाचवणारा आज फक्त परमेश्‍वर आहे असेच नाइलाजाने म्हणावे लागते. महात्मा गांधींची रामराज्याची सत्यनिष्ठा आजच्या राज्यकारभारात कुठे शोधावी?
कल्पनेने काय लिहावे आणि कसे लिहावे? चमचेगिरी करण्यासाठी लिहावे की स्वार्थ साधण्यासाठी लिहावे? पण जे आपण लिहितो ते समाजाच्या प्रबोधनासाठी असायला हवे. फक्त कलेसाठी कला नाही तर जीवनासाठी कला असायला हवी. चांगल्या लेखकाने समाजात चांगले परिवर्तन घडवले पाहिजे. प्रत्येक लेखकाची, कवीची, पटकथालेखकाची, नाटककाराची ही सामाजिक बांधीलकी असते. कलेच्या प्रकटीकरणाचे त्याला जरूर स्वातंत्र्य असायला हवे. ज्या समाजाच्या कल्याणासाठी तो रात्रंदिन वावरतो त्याच समाजाकडून त्याला संरक्षण मिळायला हवे. त्याच्या अभिव्यक्तीची ताकद कमी न होता दिवसेंदिवस वाढायला हवी. दूषणांनी आणि आरोपांनी हतबल, नाउमेद, निरुत्साही न होता त्याची शक्ती, हुरूप आणि उत्साह वाढत जायला हवा. ललित लेखनाचे उद्दिष्ट कल्पना-साहित्याने साध्य करायला हवे. काल्पनिक साहित्यालाच जर आपण पदोपदी अडवता तर उत्कृष्ट साहित्यिक कसा बरे निर्माण होईल?