कला अकादमी वाचवा

0
13

सत्तर कोटी रुपये खर्चून कथित नूतनीकरण झालेल्या गोवा कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कलामंदिराला मान्सूनपूर्व सरींच्या पहिल्याच तडाख्यात लागलेली गळती आणि त्यावर साबांखाकडून चाललेली सारवासारव राज्यातील तमाम कलारसिकांना अस्वस्थ करणारी आहे. गेल्या महिन्यात नूतनीकृत कला अकादमीत गळती लागली तेव्हा साबांखाने इमारतीच्या छतावर झाडांची पाने साचल्याने पाणी आत शिरल्याचे स्पष्टीकरण देत कंत्राटदाराला क्लीन चीट दिली होती. आता वातानुकूलन यंत्रणेच्या डक्टमधून पाणी आत शिरल्याचे कारण साबांखाच्या प्रधान अभियंत्यांनी दिले आहे. ज्या खासगी एजन्सीने हे नूतनीकरणाचे काम केले आहे, त्याला ह्या साऱ्या गळती प्रकरणातून वाचवण्याची ही एवढी धडपड का, त्यामागे कोणते हितसंबंध दडलेले आहेत असा प्रश्न त्यामुळे जनतेला पडला आहे. गोवा कला अकादमी ही केवळ एक वास्तू नव्हे, तर ती गोव्याची शान आहे याची किमान जाण गेली तीन वर्षे हा खेळखंडोबा चालवलेल्यांना आहे काय? कला अकादमीच्या वास्तूवर घाला घालण्याचे अनेक प्रयत्न आजतागायत झाले. सुरवातीला कला अकादमीची वास्तू अपुरी पडत असल्याचे सांगत दर्यासंगमावरील झाडे तोडून तेथे विस्तारित बांधकाम करण्याचा डाव काहींनी आखला होता. नंतर मूळ वास्तू पाडून त्या जागी बहुमजली इमारत उभारण्याचे डोहाळे काहींना लागले होते. कलासक्त गोमंतकीय जनतेच्या प्रखर विरोधामुळे हे बेत फसले. मग सीपीडब्ल्यूडीच्या नियमांना हरताळ फासून निविदा न मागवता नामनिर्देशन पद्धतीने विशिष्ट एजन्सीला हे नूतनीकरणाचे काम बहाल करण्यात आले. महान वास्तुविशारद चार्ल्स कुरैय्या यांचा वारसा जपणाऱ्या चार्ल्स कुरैय्या फाऊंडेशनने देऊ केलेली मदत उद्दामपणे नाकारण्यात आली. त्यांच्यावर नाना दोषारोप करण्यात आले. मग मुंबईच्या एजन्सीला विनानिविदा काम सोपवले कोणी ह्यावरून सार्वजनिक बांधकाम खाते आणि कला संस्कृती खाते ह्यांच्यातच जुंपली. एका वर्षाच्या आत पूर्ण करावयाचे हे दुरुस्तीकाम लांबत गेले, तरी संबंधित एजन्सीला दंडही झाला नाही वा निकृष्ट कामांची चौकशीही झाली नाही. त्यातच नूतनीकरणाच्या उद्घाटनाचा मुहूर्त जवळ आलेला असताना अकादमीच्या खुल्या नाट्यगृहाचा स्लॅब कोसळला. केवळ सुदैव म्हणजे तोवर ते प्रेक्षकांना खुले झाले नव्हते. मग त्या कोसळलेल्या स्लॅबचे प्रकरण पडद्याआड ढकलण्याचा जोरदार प्रयत्न झाला. नूतनीकरण झालेल्या कला अकादमीचे मोठा गाजावाजा करीत उद्घाटन झाले. परंतु हे नूतनीकरण ह्या पन्नास वर्षे जुन्या बांधकामाला मूलभूत बळकटी देणारे झाले आहे ना, की ही वरवरची मलमपट्टी आहे असा सवाल आम्ही तेव्हा केला होता. पहिल्या पावसात, नव्हे, नुसत्या मान्सूनपूर्व सरी कोसळताच सत्य उघडे पडले. साबांखाने अद्याप कला अकादमीचा ताबा दिलेला नाही अशी सारवासारव आता कला आणि संस्कृती खाते करते आहे. अधिकृतपणे ताबा जर मिळालेला नसेल, तर तियात्रांना आणि महोत्सवांना कला अकादमी खुली कशी झाली? तेथे काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोणाची? हे सरकार आणि विशेषतः कला आणि संस्कृती खाते नुसते इव्हेंटबाजीला सोकावले आहे. विविध इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांशी खात्याचे फार साटेलोटे दिसते. परंतु ह्या दिखाऊ चमचमाटात संभाव्य भ्रष्टाचाराचे एकेक सांगाडे उघडे पडत आहेत त्याचे काय? कला अकादमीवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही जर मुख्य सभागृहामध्येच पाणी तुंबत असेल तर ही बाब फार गंभीर आहे. थातुरमातूर कारणे देऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने वा कला संस्कृती खात्याने यावर हात झटकू नयेत. कोणत्याही कारणाने पाणी आत प्रवेशणार नाही ना ह्याची खातरजमा करणे हे साबांखाचे काम होते आणि सर्व प्रकारे वापर करण्यास ती योग्य आहे ह्याची खात्री झाल्यावरच ती प्रेक्षकांना खुली करणे ही कला आणि संस्कृती खात्याची जबाबदारी होती. कामे व्यवस्थित झालेली आहेत ह्याची खात्री नसताना उद्घाटनाची घिसाडघाई का केली गेली? कार्यक्रमांना आणि तियात्रांना कला अकादमीचे मुख्य सभागृह खुले कसे झाले? कला अकादमीच्या गेटवर आज तियात्रांची फ्लेक्सची बॅनर्स विद्रुप पद्धतीने लटकावलेली दिसतात हा कसला तमाशा आहे? मुळात ह्या वास्तूच्या उभारणीमागे काही दृष्टी आहे, भोवतालचा परिसर, तेथील निसर्ग, ऊन, पाऊस, वारा ह्या सगळ्याचा विचार करून उभारलेली ही वास्तू आहे ह्याचे भान स्वतः कलाकार असलेल्या कला आणि संस्कृतीमंत्र्यांना आहे काय? कला अकादमीचे हे नष्टचर्य एकदाचे संपायला हवे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कला अकादमीचा ताबा स्वतःकडे घ्यावा आणि तिच्याशी गेली तीन वर्षे मांडला गेलेला हा खेळ थांबवावा.