कला अकादमी भजन स्पर्धेत धारगळचे शांतादुर्गा केंद्र प्रथम

0
126

कला अकादमी आयोजित राज्यस्तरिय भजनसम्राट स्व. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती पुरुष विभागाच्या भजन स्पर्धेत श्री शांतादुर्गा कला केंद्र, धारगळच्या भजनी पथकाने पन्नास हजार रुपये रोख व मनोहरबुवा शिरगावकर फिरता चषक असा प्रथम क्रमांकाचा मान मिळविला.
साकोर्डा येथील विठ्ठल रखुमाई भजनी मंडळाला द्वितीय, श्री सातेरी केळबाय बारावंश भजनी मंडळ मोर्ले-सत्तरीला तृतीय व श्री हनुमंत बलभीम महारुद्र भजनी मंडळ, पिळगावला चौथे पारितोषिक प्राप्त झाले. उत्तेजनार्थ बक्षिसे श्री सातेरी देवस्थान भजनी मंडळ मौळा-भाटी व श्री लक्ष्मी भजनी मंडळ सावईवेरे यांना देण्यात आली.
स्पर्धेतील उत्कृष्ट गायकाचे प्रथम बक्षीस दत्ताराम च्यारी (श्री शांतादुर्गा कला केंद्र, धारगळ), द्वितीय बक्षीस नागेश मनोहर च्यारी (श्री सातेरी देवस्थान भजनी मंडळ, मौळा-भाटी), यांना उत्कृष्ट पखवाज साथीचे प्रथम बक्षीस पुष्पशील मळीक (श्री हनुमान बलभीम महारुद्र भजनी मंडळ, पिळगाव), व द्वितीय बक्षीस देविदास गावस (देवांगण कला सांस्कृतिक भजनी मंडळ सांतान-कुडका) यांना, उत्कृष्ट हार्मोनियम साथीचे प्रथम बक्षीस यशवंत नारायण आम्रोसकर (मुशेले कला भजनी मंडळ, वास्को) व द्वितीय बक्षीस रामचंद्र पार्सेकर (श्री शांतादुर्गा कला केंद्र, धारगळ) यांना, उत्कृष्ट गौळण गायनाचे प्रथम बक्षीस उमेश पळ (श्री हनुमान बलभीम महारुद्र भजनी मंडळ, पिळगाव) व द्वितीय किशोर तोरस्कर (मुशेले कला मंडळ, वास्को) यांना देण्यात आली. स्वातंत्र्यदिनी कला अकादमीच्या मा. दीनानाथ कला मंदिरात ही स्पर्धा दिवसभर पार पडली व ती ऐकण्यासाठी भजनीप्रेमी रसिकांची गर्दी होती.
सायंकाळी झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्याला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर कला व संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर, अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर, सदस्य सचिव प्रसाद लोलयेकर, परीक्षक मंडळावरील पं. प्रभाकर कारेकर, उद्धव शिंदे आपेगावकर व रघुनाथ पेडणेकर ही मंडळी उपस्थित होती. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी, कला अकादमीला मा. दिनानाथ कला मंदिर अपुरे पडत आहे तेव्हा दोन ते अडीच हजार रसिकांना बसता येईल अशा क्षमतेचे दुसरे थिएटर येत्या अडीच वर्षांत उभारले जाईल अशी घोषणा केली.