कला अकादमी इमारतीचा ऑडिट अहवाल द्या

0
6

>> मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा साबांखाला निर्देश; पाणीगळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना

कला अकादमीतील खुला रंगमंच कोसळल्यानंतर ऑडिट अहवाल सादर करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आला होता; मात्र कित्येक महिने उलटले तरी हा अहवाल प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याला कला अकादमीचा ऑडिट अहवाल सादर करण्याचा निर्देश देण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

कला अकादमीच्या मुख्य सभागृहात अवकाळी पावसाच्या वेळी गळती झाली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य प्रधान अभियंत्यांना कला अकादमी प्रकरणी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आला आहे.
कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात होऊन साधारण तीन वर्षे पूर्ण झाली आहेत; मात्र अजूनपर्यंत कला अकादमीचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याने कला अकादमीतील गळतीला पहिल्यांदा छप्परावरील साचलेला पाला पाचोळा आणि दुसऱ्यांदा एसी मशीनच्या दुरुस्ती कामाला जबाबदार धरले आहे.

नूतनीकरणाच्या कामामुळे गेली काही वर्षे कला अकादमी चर्चेचा विषय बनली आहे. कला अकादमीच्या अंदाजे पन्नास कोटी रुपये खर्चून झालेल्या नूतनीकरणाच्या कामासाठी निविदा काढण्यात न आल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. तथापि, कला-संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमीच्या कामाच्या नूतनीकरणाची निविदा न काढण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. नूतनीकरणाचे काम सुरू असतानाच त्यातील खुला रंगमंच कोसळला होता. त्यानंतर ऑडिट करण्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली होती. एक वर्षाचा काळ उलटला तरी कला अकादमीचा हा अहवाल सादर झालेला नाही.