कला अकादमीमधील त्रुटींची माहिती व्हिडिओद्वारे व्हायरल

0
6

राजदीप नाईक यांनी उघड केली दूरावस्था

कला अकादमीच्या नूतनीकरणानंतरच्या दूरावस्थेबाबत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता, प्रसिद्ध नाट्यकलाकार राजदीप नाईक यांचा कला अकादमीतील ध्वनियंत्रणा, प्रकाश योजना, पडदे व इतर त्रुटींची माहिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राज्यातील कलाकारांनी कला अकादमीच्या विषयावर बैठक घेऊन कला अकादमीच्या नूतनीकरणानंतरच्या दूरावस्थेला कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना जबाबदार धरले. नूतनीकरणाबाबत श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली. त्यानंतर, मंत्री गावडे यांच्या समर्थकांनी एक खास मंच स्थापन करून कला अकादमीच्या विषयावरून मंत्री गावडे यांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला. तसेच, अकादमीमध्ये कुठल्याच त्रुटी नसल्याचा दावा एका पत्रकार परिषदेत शनिवारी केला. त्याच दिवशी संध्याकाळी नाट्यकलाकार राजदीप नाईक यांनी कला अकादमीतील प्रकाश योजना, ध्वनी व इतर त्रुटींची माहिती देणारा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केला. कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर कुठल्याही त्रुटी राहिलेल्या नाहीत, असा दावा करणाऱ्यांना कला अकादमीला प्रत्यक्ष भेट देऊन कला अकादमीची पाहणी करून त्रुटी जाणून घेण्याचे आवाहन राजदीप नाईक यांनी केले.

मुख्य थिएटरमध्ये समस्या

अकादमीचे मुख्य थिएटर नूतनीकरणानंतर नाट्यप्रयोग, तियात्र, कार्यक्रमांसाठी खुले करण्यात आले आहे. या थिएटरमध्ये नाट्यप्रयोग, तियात्र सादर करणाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नवीन ध्वनियंत्रणा, प्रकाश योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. यामध्ये काही त्रुटी असल्याने नाट्यप्रयोग, तियात्र सादरीकरण करणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बाहेरून ध्वनियंत्रणा आणून बसवावी लागत आहे. प्रकाश योजनेसाठी वेगळी रचना करावी लागत आहे. कला अकादमीमधील नवीन पडदे दर्जेदार नसल्याची टीका केली जात आहे. कला अकादमीतील ग्रीन रूममधील वीज व्यवस्था व इतर अनेक समस्या नजरेसमोर आणून देऊन सुधारणा करण्याची मागणी नाट्यकलाकार राजदीप नाईक यांनी केली आहे.