कला अकादमीत यंदा इफ्फीतील चित्रपटांचे प्रदर्शन नाहीच

0
4

>> आवश्यक साधनसुविधांचा अभाव; इफ्फीच्या तांत्रिक समितीकडून चित्रपट दाखवण्यास मनाई; मुख्यमंत्र्यांची माहिती

गोवा कला अकादमीमध्ये यंदाच्या इफ्फीतील चित्रपटांचे प्रदर्शन केले जाणार नाही. कला अकादमीच्या आवारात केवळ मास्टर क्लास घेतले जातील. कला अकादमीची नूतनीकरण केलेली वास्तू अलीकडेच पुन्हा लोकांसाठी खुली करण्यात आली आहे. कला अकादमीच्या मुख्य थिएटरमध्ये चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी आवश्यक सुविधा नसल्याने इफ्फीच्या तांत्रिक समितीने चित्रपट दाखवण्यास मान्यता दिलेली नाही. त्यामुळे तेथे सिनेमांचे स्क्रिनिंग केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. इफ्फीच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

10 नोव्हेंबरला सरकारने मोठा गाजावाजा करत नूतनीकृत कला अकादमीचे उद्घाटन केले होते. इफ्फीच्या पार्श्वभूमीवर घाईगडबडीत कला अकादमी खुली करण्यात आली होती. कला अकादमीच्या नूतनीकरणावर 50 कोटींचा खर्च करण्यात आला होता. मात्र चित्रपटांच्या स्क्रिनिंगसाठी आवश्यक सुविधाच कला अकादमीत नसल्याने किमान यावेळी तरी त्या ठिकाणी चित्रपट दाखवले जाणार नाहीत. एवढे कोट्यवधी रुपये खर्चूनही कला अकादमीत चित्रपटांचे प्रदर्शन होणार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्यात येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात होणाऱ्याइफ्फीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. इफ्फीशी संबंधित 99 टक्के काम पूर्ण झाली आहेत. राज्य सरकारचा कन्व्हेन्शन सेंटर स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा वापर इफ्फीसाठी कायमस्वरूपी ठिकाण म्हणून केला जाऊ शकतो. या सेंटरच्या कामाच्या कामासाठी निविदा काढण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. आता, पुन्हा एकदा कन्व्हेन्शन सेंटरच्या कामासाठी नव्याने प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावर्षी इफ्फीमध्ये 198 आंतरराष्ट्रीय चित्रपट, त्यापैकी 13 जागतिक प्रीमियर्स दाखवले जाणार आहेत. एकूण 270 चित्रपट 4 ठिकाणी प्रदर्शित केले जातील. या पत्रकार परिषदेला गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा यांची उपस्थिती होती.

फिल्म सिटीसाठी भाडेतत्त्वावर जमीन घेणार
गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) फिल्म सिटी प्रकल्प उभारण्यासाठी जमीन भाडे तत्त्वावर घेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काल दिली. फिल्म सिटी प्रकल्पामुळे रोजगार आणि चित्रपट निर्मितीला चालना मिळू शकते. लोलये कोमुनिदादने फिल्म सिटीसाठी सुमारे 250 एकर जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. या फिल्म सिटीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.