पणजी (सां. प्र.)
‘स्वरधारा’ संस्थेतर्फे, कला आणि संस्कृती संचालनालय गोवा व कला अकादमी गोवा यांच्या सौजन्याने बुधवार १७ रोजी सायंकाळी ५ वा. कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात ‘सबरंग’ हा मराठी, हिंदी गीते व नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.
यात बाल व युवा उभरत्या १४ हून जास्त कलाकारांचा समावेश असेल. विद्या व वरदा शिरोडकर, गणराज च्यारी, ऋषिकेश ढवळीकर, तेजस वेर्णेकर, वृथा करमळी, प्रवण हेदे, अनिकेत डड्डीकर, गौतमी हेदे बांबोळकर, समृद्ध चोडणकर, विराज वेरेकर, ऊर्जा नाईक गावकर, अनुष्का थळी व समीक्षा भोबे काकोडकर हे कलाकार विविध गीत प्रकार सादर करतील. तर प्रसिद्ध नृत्यांगना मंदिरा जोशी यांच्या निर्देशनासाठी नृत्याचा कार्यक्रम होईल. विष्णू शिरोडकर व वाद्यवृंदाची साथसंगत असेल.
‘स्वरधारा’चा १० वा नादश्री पुरस्कार प्रदान सोहळा तत्पूर्वी होईल. हा पुरस्कार ज्येष्ठ संगीत शिक्षक राजेंद्र सिंगबाळ (म्हापसा) यांना प्रदान करण्यात येईल. शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह व रोख १५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिनो फार्मास्युटीकल्सचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप साळगावकर उपस्थित राहतील तर सन्माननीय पाहुण्या म्हणून वास्को येथील षड्ज गंधार संगीत अकादमीच्या कार्यकारी सदस्या मधुरा बांदेकर असतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कला संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळर्णकर भूषवितील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.