कला अकादमीत उद्या ‘अभिषेकी रंग’ मैफल

0
118

गुढीपाडव्यानिमित्त स्वस्तिकतर्फे आयोजन
स्वस्तिक पणजीतर्फे सलग आठव्या वर्षी हिंदू नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सोमवार २३ रोजी संध्याकाळी ७ वा. कला अकादमीच्या खुल्या नाट्यगृहात ‘अभिषेकी रंग’ ही खास मैफल होणार आहे. प्रतिभावान गायक स्व. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या अजरामर व लोकप्रिय रचना तसेच आजपर्यंत न ऐकलेल्या (अप्रचलित) रचना भक्तिगीत, नाट्यगीत व भावगीत रुपाने त्यांचेच सुपुत्र युवा प्रतिभेचे गायक शौनक अभिषेकी सादर करणार आहेत.शौनक अभिषेकी हे आजच्या घडीचे आघाडीचे गायक आहेत. शास्त्रीय गायनाबरोबर भक्तिगीत, नाट्यगीत व भावगीत तितक्याच तयारीने ते गातात. अभिजात गायकीची परंपरा सांभाळतानाच नाविन्यतेचा ध्यास घेतलेले ते एक अष्टपैलू गायक आहेत, असे पत्रकार परिषदेत स्वस्तिकचे अध्यक्ष प्रवीण गावकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे निवेदन करण्यासाठी लोकप्रिय निवेदिका धनश्री लेले (मुंबई) यांना निमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिषेकींच्या सांगीतिक जीवनाच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण निवेदन रसिकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाला तबल्यावर दयेश कोसंबे, संवादिनीवर राया कोरगावकर, पखवाजवर विशांत सुर्लकर तर तालवाद्यावर राहुल खांडोळकर साथ करणार आहेत. सदर कार्यक्रम ‘लिंक प्रॉपर्टीज, स्टेट बँक ऑफ इंडिया’ व ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’ यांनी पुरस्कृत केला आहे. प्रायोजकांच्या आधारामुळे हा कार्यक्रम सर्व रसिकांना खुला राहील व त्याच्या विनामूल्य प्रवेशिका ‘पु. ना. गाडगीळ’ ज्वलेर्स, सांतइनेज-पणजी, अनंताश्रम रेस्टॉरंट वास्को, लिंक प्रॉपर्टीज, दयानंद बांदोडकर मार्ग, मिरामार व आयएफबी पॉईंट, एचडीएफसी बँक समोर, मरड – म्हापसा येथे उपलब्ध आहेत, असे डॉ. गावकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पी. एन. जी. ज्वेलर्सच्या गोवा आस्थापनाचे व्यवस्थापक योगेश भिडे व स्वस्तिकचे श्री. मुर्गेश उपस्थित होते.