कला अकादमी गोवा, कला व संस्कृती संचालनालय व तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव दि. ९ व १० रोजी सकाळी १० ते रात्रो १० वाजेपर्यंत कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवातील सर्व सत्रातील कार्यक्रम संगीत व नृत्यप्रेमी रसिकांसाठी खुले आहेत.
या महोत्सवाचे विधिवत उद्घाटन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते व पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. महोत्सवातील विविध सत्रांत गोमंतकीय कलाकार डॉ. शिल्पा डुबळे परब (शास्त्रीय गायन) व सोनिक वेलिंगकर (बासरीवादन) यांच्या व्यतिरिक्त मोहनराव दरेकर, आरती अंकलीकर टिकेकर, जयश्री पाटणेकर, डॉ. राजा काळे, पं. विजय घाटे (तबला), पं. हरिप्रसाद चौरासिया (बासरीवादन) यांच्याशिवाय प्रथितयश कलाकार मंजिरी असनारे केळकर, धनंजय हेगडे, भुवनेश कोमकली, उस्मान खान (सतारवादन), फारूक लतीफखान (सारंगीवादन), अभिजित पोहनकर (कीबोर्ड) संजय गरूड, अनुजा झोकरकर व विद्या देशपांडे (कथ्थक नृत्य) यांचे सादरीकरण रसिकांना अनुभवता येणार आहे.
या कलाकारांना साथसंगत पं. सुधीर नायक, राया कोरगावकर, विठ्ठल खांडोळकर, सुभाष फातर्पेकर, चिन्मय कोल्हटकर, दत्तराज सुर्लकर, दत्तराज म्हाळशी (संवादिनी) तर तबलासाथसंगत पं. सुभाष कामत, पं. तुळशीदास नावेलकर, दयानिधेश कोसंबे, रोहिदास परब, विभव खांडोळकर, मयांक बेडेकर, ऋषिकेश फडके व अमर मोपकर यांच्याकडून लाभणार आहेत.
या महोत्सवात नामवंत गोमंतकीय तबलावादक पं. उल्हास वेलिंगकर यांना गौरविले जाणार आहे. महोत्सवातील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य करणार आहेत. संगीतप्रेमी रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.