कला अकादमी आयोजित राज्यस्तरीय बाल भजन स्पर्धेत पैंगीण-काणकोणच्या श्रध्दानंद विद्यालयाने प्रथम पारितोषिक पटकाविले. वेगळेच्या बालभवन केंद्राला द्वितीय तर कुडणे-डिचोलीच्या श्री महालक्ष्मी हायस्कुल बाल भजनी मंडळाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.
स्पर्धेतील चौथे बक्षिस कुडचडे येथील न्यू एज्युकेशनल सोसायटी स्कूलच्या बाल भजनी पथकाला तर उत्तेजनार्थ पारितोषिके श्रीराम सेवा संघ बाल भजन मंडळ, मयडे-बार्देस व डिचोली येथील वाठादेव बाल भजनी मंडळाला देण्यात आली.
स्पर्धेतील उत्कृष्ट गायक/गायिका म्हणून श्रीया मनोहर टेंगसे, उत्कृष्ट पखवाज साथी म्हणून यश हनुमंत केळकर (बालभवन केंद्र, वेळगे), उत्कृष्ट हार्मोनियम साथी म्हणून सायली सतीश च्यारी (श्रीराम सेवा संघ, मयडे) तर उत्कृष्ट गौळण गायक/गायिका म्हणून- अंकिता गोकुळदास मळीक (महालक्ष्मी हायस्कुल, कुडणे) यांना पारितोषिके प्राप्त झाली. परीक्षक म्हणून सुरेंद्र बोरकर, गोरख मांद्रेकर व शाम पार्सेकर यांनी काम पाहिले. कला संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुणे दयानंद मांद्रेकर म्हणाले, अकादमीच्या भजन स्पर्धेत महिला पथकांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे. बाल कलाकारांच्या पथकांची संख्याही वाढायला हवी. सर्व बाल भजनी पथकात व बालकच साथी असावेत व सर्व महिला पथकात महिलाच साथीदार असाव्यात असे निकष येत्या तीन वर्षांत करण्यात येतील. कला-संस्कृती संचालनालयाने २१४ संगीत शिक्षकांना सरकारी सेवेत सामावून घेतले आहे. त्यांचे मार्गदर्शन बालकांना मिळण्यास मदत होईल असे मांद्रेकर यांनी सांगितले.
स्वागतपर भाषणात अकादमीचे उपाध्यक्ष सुशांत खेडेकर यांनी सांगितले की, मुलांचा प्रतिसाद बघून दोन वर्षांपूर्वी बाल पथकांसाठी स्वतंत्र गटात स्पर्धा घेण्याचे ठरविले. यंदा ४३ पथकांनी सहभाग दिला व त्यातून सुमारे ६०० मुलांनी भाग घेतला होता. गोमंतकीय भजनी परंपरेची गुडी आपल्या खांद्यावर घेण्यास ही मुले पुढे येत आहेत याचा आनंद आहे.
सचिव प्रसाद लोलयेकर यांनी कला-संस्कृतीमंत्री व अकादमीचे उपाध्यक्ष यांना तर अकादमीचे कार्यक्रम विकास अधिकारी डॉ. दत्तगुरु आमोणकर यांनी परीक्षकांना पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. कार्यक्रम अधिकारी प्रदीप गावकर यांनी सूत्रसंचालन केले.