कला अकादमीच्या दुरवस्थेला सरकार जबाबदार : आलेमाव

0
10

कला अकादमीच्या दुरवस्थेला राज्य सरकार जबाबदार आहे. जवळपास 70 कोटी रुपये खर्चूनही कला अकादमीमध्ये अनेक त्रुटी कायम असल्याने कलाकार आणि कला रसिकांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे इमारतीच्या नूतनीकरणाची जबाबदारी देण्यात आली होती; मात्र योग्य प्रकारे नूतनीकरण करण्यात साबांखा अपयशी ठरले आहे. तसेच कला अकादमीतील प्रकाश योजना आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा कालबाह्य आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल विधानसेत कला व संस्कृती खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना सांगितले.

कला अकादमीचे गेली दोन वर्षे नूतनीकरण सुरू असून, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत; मात्र अद्यापही ती कार्यक्रमांसाठी उपलब्ध झालेली नाही. विधानसभेत कालच्या चर्चेवेळी कला अकादमीच्या दुरवस्थेचा मुद्दा जोरकसपणे मांडला.

गोवा कला अकादमी नूतनीकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने कला आणि संस्कृती खात्याची प्रतिष्ठा डागाळली आहे. कला अकादमीची दयनीय अवस्था आणि कलाकारांना पुरेशा सुविधांचा अभाव हा चिंतेचा विषय आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
‘गोव्याच्या ताजमहाला’चा इतिहास सर्वांच्या समोर आहेच. नूतनीकरणाचे काम सुरू असताना खुला रंगमंचाचा छत कोसळला. त्यानंतर कला अकादमीतील छताचा भाग कोसळला. सुमारे 75 कोटी रुपये खर्चूनही नागरिकांना सुसज्ज कला अकादमी उपलब्ध होत नाही. नूतनीकरणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले जात आहे, त्या आरोपांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.