कला अकादमीच्या टेरेसच्या दुरुस्तीचे काम येत्या पावसाळ्यानंतर म्हणजे ऑक्टोबरच्या दरम्यान हाती घेण्यात येणार असल्याची माहिती काल कला अकादमीचे चेअरमन गोविंद गावडे यानी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पंचायत निवडणुकांमुळे आता लवकरच निवडणूक आचार संहिता लागू होणार असून त्यामुळे वरील कामासाठी निविदा काढता येणार नसल्याचे गावडे म्हणाले. नंतर पावसाळा सुरू होणार असून त्यामुळे अकादमीच्या टेरेसच्या दुरुस्तीचे काम ऑक्टोबर महिन्यातच हाती घेणे शक्य होणार असल्याची माहिती गावडे यानी दिली.
कला अकादमीचे दीनानाथ मंगेशकर सभागृह येत्या ३१ मार्चपर्यंत खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात थोडी वाढही होऊ शकते. पण त्याबाबत नंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे गावडे यानी स्पष्ट केले. तियात्र व नाट्यकर्मीं यांची गैरसोय होऊ नये असे आम्हाला वाटत आहे व त्याबाबत काय करता येईल याचा निर्णय घेऊ, असे गावडे यानी यावेळी नमूद केले. कला अकादमीच्या वास्तूचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, न्यायालयाने टेरेसच्या दुरुस्तीच्या कामाला हिरवा कंदिल दाखवला असल्याची माहिती गावडे यानी दिली.
कला अकादमीच्या वास्तूची दुरुस्ती करण्याची गरज आहे ही बाब दहा वर्षांपूर्वीच स्पष्ट झाली होती.