कला अकादमीच्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढा

0
12

>> पणजीत आयोजित बैठकीत कलाकारांची मागणी; 15 दिवसांत कला अकादमी खुली न केल्यास गोविंद गावडे यांनी मंत्रिपद सोडावे

गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या भोंगळ कारभाराबाबत राज्यातील कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, राज्य सरकारने कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामाबाबत सविस्तर श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी पाटो-पणजी येथील श्रमशक्ती भवनातील गोवा श्रमिक पत्रकार संघाच्या (गुज) सभागृहात आयोजित कलाकारांच्या बैठकीत काल करण्यात आली. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी 15 दिवसांत सर्व सुविधांनी युक्त असलेली कला अकादमी कलाकारांसाठी खुली करावी; अन्यथा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील बैठकीत करण्यात आली. या बैठकीला खुद्द कला व संस्कृती मंत्री तथा कला अकादमीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांची उपस्थिती होती. मात्र गावडे यांनी बैठकीनंतर याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

राज्य सरकारने पूर्वीसारखी सर्व साधनसुविधांनी युक्त कला अकादमी कलाकारांसाठी उपलब्ध केली पाहिजे. कला अकादमीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तथापि, ध्वनी यंत्रणा व इतर व्यवस्थेमध्ये त्रुटी आहेत, असे माजी आमदार तथा माजी सभापती तोमाझिन कार्दोज यांनी सांगितले. नूतनीकरण करण्यापूर्वी कला अकादमीमध्ये कलाकारांना कोणत्याही प्रकारच्या अडी अडचणींना तोंड द्यावे लागत नव्हते. तशा प्रकारची कला अकादमी पुन्हा कलाकारांना उपलब्ध करून द्यावी. राज्य सरकारने कला अकादमीबाबत कलाकारांचा सूचना विचारात घेतल्या पाहिजेत, असेही कार्दोज यांनी सांगितले.

कला अकादमी ही राज्यातील कलाकारांची पंढरी म्हणून ओळखली जाते. या कला अकादमीमुळे आम्ही घडलो आहोत. तथापि, कला अकादमीची आजची दुरवस्था पाहून दुःख होत आहे. कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी नूतनीकरण केलेली कला अकादमी सर्व साधनसुविधांनी पुन्हा कलाकारांना उपलब्ध झाली पाहिजे, असे ज्येष्ठ कलाकार कांता गावडे यांनी सांगितले.

कला अकादमी इमारतीच्या केवळ नूतनीकरणासाठी तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणे कशाचे लक्षण आहे. तीन वर्षे घर बांधायला लागत नाहीत. या ठिकाणी तर केवळ नूतनीकरणाचे काम झाले आहे. सुमारे 75 कोटी रुपये खर्चून नूतनीकरण केलेल्या इमारतीमध्ये पावसाळ्यात गळती लागते हे धक्कादायक आहे, असे देविदास आमोणकर यांनी सांगितले.

मागील तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कला अकादमीची इमारत नूतनीकरणाच्या नावाखाली कार्यक्रमांसाठी बंद आहे. काही महिन्यांपूर्वी कला अकादमीचा काही भाग वापरासाठी खुला करण्यात आला. तथापि, मुख्य सभागृहात ध्वनी यंत्रणा, प्रकाश योजना व इतर व्यवस्थेमध्ये त्रुटी आहेत. कला अकादमीतील विविध प्रकारच्या त्रुटी दूर करून लवकरात लवकर कला अकादमी कलाकारांसाठी खुली करण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूने कला अकादमीच्या नूतनीकरणाबाबत दक्षता खात्याकडे आणि न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे, असे किशोर नाईक यांनी सांगितले. या बैठकीत गोविंद शिरोडकर, तनोज अडवलपालकर, प्रकाश नाईक व इतर अनेकांनी विचार मांडले. राजदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले.