गोवा कला अकादमीच्या इमारतीचे नूतनीकरण ही काळाची गरज होती. पुढील 50 वर्षांचा विचार करून कला अकादमीच्या इमारतीचे नूतनीकरण केले आहे. तसेच राज्यातील कलाकारांना आवश्यक नवीन साधनसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कला अकादमीच्या इमारतीला 50 वर्षे पूर्ण झाल्याने ती कमकुवत झाली होती. जुनी इमारत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भक्कम करण्यात आली आहे. तसेच येत्या डिसेंबरपासून कला अकादमी विविध कार्यक्रमांसाठी उपलब्ध केली जाणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केले. नूतनीकृत कला अकादमीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, कला-संस्कृती खात्याचे सचिव मिनिनो डिसोझा, संचालक सगुण वेळीप, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, कला अकादमीचे सदस्य सचिव विनेश आर्लेकर याची उपस्थिती होती.
कला अकादमीला नूतनीकरणाच्या माध्यमातून नवीन साज देण्यात आला आहे. नवीन साधनसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नूतनीकरणाच्या कामावरून नाहक गदारोळ निर्माण करण्यात आला. कला अकादमीच्या जुन्या वास्तूमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जुनी वास्तू आणखी मजबूत करण्यात आली आहे, असे गोविंद गावडे यांनी सांगितले.