– दत्ता भि. नाईक
घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर त्याच्या वारसांची महत्त्वाकांक्षा ज्या गतीने वाढते त्यावर लगाम घालणे कुणालाच शक्य होत नाही. ‘कलाईग्नार’ म्हणजे कलानिपुण असलेल्या करुणानिधींच्या निधनानंतर त्यांनी सांभाळून ठेवलेल्या द्रमुक पक्षाचे विभाजन होणे सध्यातरी अटळ दिसते.
मंगळवार दि. ७ ऑगस्ट रोजी तमिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री व द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष व सर्वेसर्वा असलेले श्री. एम. करुणानिधी यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय होते ९४ वर्षे. त्यामुळे त्यांचे निधन अचानकपणे झाले असे म्हणता येत नाही व जवळच्या नातेवाईक व पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मृत्यूमुळे कितीही दुःख झाले म्हणून त्यांचे निधन म्हणजे एक दुःखद घटना आहे असे म्हणता येत नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, देशाच्या व तमिळनाडूच्या राजकारणातील एका महापर्वाची त्यांच्या निधनामुळे इतिश्री झालेली आहे. एखादा जुनाट वृक्ष उन्मळून पडला म्हणजे आजूबाजूची माणसे, पशुपक्षी यांच्यावर जसा खोल परिणाम होतो, तसेच याही बाबतीत झाले आहे. शेवटचे अकरा दिवस ते चेन्नई शहरातील कावेरी रुग्णालयात उपचार घेत होते.
द्रविड कळघमची चळवळ
द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे ज्येष्ठ नेते व तमिळनाडूचे पहिले कॉंग्रेसेतर मुख्यमंत्री अन्नादुराई यांच्या मृत्यूनंतर पक्षाच्या नेतृत्वाची व मुख्यमंत्रिपदाची धुरा करुणानिधी यांनी आपल्या खांद्यावर घेतली व मृत्यूपर्यंत सांभाळली. वेळोवेळी आपल्या नेतृत्वगुणांची चुणूकही दाखवली. त्यामुळे ते राज्याच्या राजकारणात ‘कलाईग्नार’ या आदरवाचक नावानेच ओळखले जाऊ लागले. (कलाईग्नार याचा अर्थ कलानिपुण) मुथुवेल करुणानिधी यांचे मूळ नाव दक्षिणामूर्ती करुणानिधी. फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव बदलण्याची पद्धत असल्यामुळे असेल वा हिंदी भाषेतून घेतलेलं नाव असे वाटल्यामुळे असेल, त्यांनी स्वतःचे दक्षिणामूर्ती हे नाव बदलून मुथुवेल हे नाव स्वीकारले.
स्वातंत्र्यचळवळीच्या काळातच दक्षिण भारतात ‘द्रविड कळघम’ नावाची चळवळ सुरू झाली. या चळवळीचे मुख्य प्रणेते होते रामस्वामी नायकर. हे रामस्वामी स्वतःला रावणभक्त म्हणायचे. शिक्षण, सामाजिक मानसन्मान, आर्थिक सुबत्ता यांपासून वंचित राहिलेल्या समाजामध्ये त्यांनी अस्मिता फुलवण्याचे काम केले. हिंदी ही उत्तर भारतीयांची भाषा दक्षिणेवर लादली जाते असाही ते प्रचार करायचे. रामचरितमानस व रेल्वे वेळापत्रक हे दोनच हिंदी भाषेतील ग्रंथ आहेत, असे ते म्हणायचे. आपल्याला आवडलेली दुसर्याची बायको पळवून नेण्याचा नागरिकांना हक्क असला पाहिजे यासारखी विधाने त्यांच्या नावावर आहेत. इंग्रजांनी आर्य आणि द्रविड ही कल्पना शिक्षणक्रमातून देशाच्या कानाकोपर्यांत नेली. उत्तरेचे लोक आर्य असून दक्षिणेचे द्रविड आहेत असा प्रचार केला गेला. द्रविड कळघमच्या नेतृत्वाने हाच मुद्दा उचलला व जगातील सर्व तमिळ लोकांचे वेगळे राष्ट्र बनवण्याची ‘तमीळ इलम’ ही कल्पनाही मांडली. हिंदू देवदेवतांची विटंबना करणे हा त्यांचा नित्याचा कार्यक्रम होता. तरीही वंचित समाजाबद्दलची त्यांची तळमळ पाहता त्यांची काही बाबतीत महात्मा फुल्यांशी तुलना करावी लागेल. त्यांचे चित्र असलेले पन्नास पैशांचे टपाल तिकीटही भारत सरकारने जारी केलेले आहे. त्यांच्या प्रखर मतांशी फारकत घेऊन व द्रविड भावनांचा आधार घेत त्यांच्या शिष्यांनी भारतीय घटना मानणार्या द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापन केली.
हिंदीविरोधी आंदोलन
ऑल तमिल स्टुडंट्स क्लब या विद्यार्थ्यांच्या मंचाद्वारे करुणानिधी यांनी सामाजिक कार्य सुरू झाले. हिंदी भाषाविरोधी आंदोलनात ते सतत सक्रिय राहिले. त्याच मार्गाने वाटचाल करत ते द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. देशाची राष्ट्रभाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल असे भारतीय घटनेत लिहिलेले असले तरी सुरुवातीची पंधरा वर्षे इंग्रजीचा वापर चालू राहील अशीही तरतूद केलेली होती. ज्यावेळी ही पंधरा वर्षे संपली तेव्हा स्व. लालबहादूर शास्त्री हे देशाचे प्रधानमंत्री होते. त्यांची राजकारणावरील पकड स्थिर होण्यापूर्वीच दक्षिणेत हिंदीविरोधी आंदोलनाने पेट घेतला तेव्हा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते के. कामराज. ते स्वतःचे व्यक्तिगत आसन पक्के करण्याच्या मागे लागले. खुद्द कॉंग्रेस पक्षाने अंतर्गत भांडणाला वाव देऊन उत्तर विरुद्ध दक्षिण असा वाद उत्पन्न केला होता. १९६७ च्या सार्वजनिक निवडणुकांत द्र.मु.क. पक्षाचा उमेदवार असलेल्या विद्यार्थी नेत्याकडून कामराज यांना पराभव पत्करावा लागला. त्याच वेळेस त्यावेळच्या मद्रास राज्यात द्रमुकची सत्ता आली व अण्णादुराई हे मुख्यमंत्री बनले. १९६९ साली ते पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. याच काळात मद्रास राज्याचे नाव बदलून तमिळनाडू असे ठेवण्यात आले. एम. जी. रामचंद्रन यांच्या अ. भा. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचा उदय होईपर्यंत ते मुख्यमंत्रिपदी अबाधितपणे राहिले. त्यानंतरही दोन्ही पक्षांमध्ये आलटून पालटून सत्तास्पर्धा चालू असली तरी द्रमुकच्या ताब्यात सत्ता आली की मुंख्यमंत्रिपदी करुणानिधी विराजमान होणार हे ठरलेले होते.
१९७१ च्या ‘गरीबी हटाव’ फेम निवडणुकीच्या काळात करुणानिधींच्या द्रमुकशी इंदिरा गांधीनी समझोता केला तेव्हा खासदारकीच्या दहा मतदारसंघांच्या बदल्यात त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा एकही उमेदवार उभा केला नाही.
तमिळनाडूच्या राजकारणातून कॉंग्रेस तेव्हापासून हद्दपार झाली ती स्वतःच्या पायावर राज्यात आजही उभी राहू शकत नाही. १९७५ साली अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालाचे निमित्त करून इंदिरा गांधीनी देशात आणीबाणी जारी केली. हा निर्णय करुणानिधींना मानवला नाही. त्यांनी केंद्र सरकारशी मतभेद व्यक्त करताच इंदिरा गांधीनी त्यांचे सरकार बरखास्त केले. इतके असूनही आणीबाणीच्या अखेरच्या पर्वात इंदिरा गांधींशी समोरासमोर येऊन कॉंग्रेसेतर पक्षांतर्फे वार्तालाप करू शकणारे ते एकमेव नेते होते.
अंत्यसंस्कारावरून वाद
सलगपणे नसले तरीही पाच वेळा म्हणजे तब्बल पंचवीस वर्षे करुणानिधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. सुरुवातीस स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करणारे करुणानिधी आणीबाणीनंतर राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. मा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा भाचा मुरास्तेला मारन वाणिज्यमंत्री होता. त्यानंतर न थांबता त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपला ठसा उमटवला. तमीळ झेंडा व तमीळ गीत यांचा आग्रह धरणार्या द्रमुक पक्षाला त्यांनी हळूहळू राष्ट्रीय प्रवाहात आणले. निवडणूक काळात द्रमुकचा कोणत्याही पक्षाशी समझोता होऊ शकतो, परंतु अ. भा. अण्णा द्रमुकशी होऊ शकत नाही. करुणानिधी यांना रात्री घरात घुसून अटक करण्याचे धारिष्ट्यही अ. भा. अण्णा द्रमुकच्या सरकारने यापूर्वी दाखवले होते. त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी मरिना बीचवर जागा देणार नाही असे वातावरण सध्याच्या अण्णा द्रमुक पक्षाच्या सरकारने तयार केले होते. शेवटी वातावरण निवळले व मरिना बीचवर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
द्रविड चळवळ ही एकप्रकारची नास्तिक चळवळ आहे. रामसेतूचा विषय निघाला तेव्हा राम हा कोणी इंजिनिअर होता का? असा प्रश्न त्यांनी विचारला. आजारपणी कपाळाला अंगारा लावण्यासही त्यांनी नकार दिला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह पुरण्यात आला यात आश्चर्य नाही. स्व. अण्णा दुराई व अलीकडेच स्वर्गवासी झालेल्या सुश्री जयललिता यांचाही मृतदेह पुरण्यात आला होता. यात हिंदुत्व नाकारण्याची प्रवृत्ती असू शकते, परंतु हिंदू धर्माला पुरणे वर्ज्य नाही हेही याठिकाणी नमूद करावेसे वाटते. मृतदेह पाण्यात सोडणे, जमिनीत पुरणे वा अग्नीच्या स्वाधीन करणे हे देहाला अनंतात विलीन करण्याचे तिन्ही मार्ग हिंदू धर्माला मान्य आहेत. तरीही अग्निसंस्काराला श्रेष्ठ मानले जाते हेही तितकेच खरे आहे.
घराणेशाहीचे परिणाम
राजकारणात वावरणार्याला इतर गोष्टीत लक्ष घालण्यास वेळ नसतो हे खरे आहे; परंतु स्व. करुणानिधी यांनी सुमारे चाळीसच्या आसपास चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या. उच्चवर्णीयांचा दंभस्फोट करणारा त्यांचा ‘पराशक्ती’ हा चित्रपट बराच गाजला. यात द्रविड चळवळीची भलावण भडकपणे केली गेली होती. राजकारणात शुद्ध चारित्र्य वगैरे गोष्टींना त्यांनी महत्त्व दिले नाही. त्यांनी तीन विवाह केले. भरपूर पैसा कमावला. टुजी स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे गाजलेल्या कन्नीमोळी या त्यांच्याच कन्या.
अनेक राजकारण्यांसारखी त्यांनीही द्रमुकमध्ये घराणेशाही प्रस्थापित केली. त्यांचे दोन पुत्र स्टॅलिन व अलागिरी, कन्या कन्नीमोळी, भाचा स्व. मुरासोली मारन, त्याचा मुलगा दयानिधी मारन हा सगळा गोतावळा त्यांनी पक्षामध्ये आणला व त्यांचे महत्त्वही वाढू दिले. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात ‘वॉर ऑफ सक्सेशन’ सुरू झाले आहे. त्यांचा राजकीय वारसा चालवण्याकरिता त्यांची तिन्ही अपत्ये व दयानिधी मारन यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. अलागिरी या पुत्राची २०१४ मध्ये पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्याने नवीन पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू केलेली आहे. घरातील कर्ता पुरुष जिवंत असेपर्यंत घराण्याचे ऐक्य अबाधित राहते, परंतु त्याच्यानंतर त्याच्या वारसांची महत्त्वाकांक्षा ज्या गतीने वाढते त्यावर लगाम घालणे कुणालाच शक्य होत नाही. कलाईग्नार म्हणजे कलानिपुण असलेल्या करुणानिधींच्या निधनानंतर त्यांनी सांभाळून ठेवलेल्या द्रमुक पक्षाचे विभाजन होणे सध्यातरी अटळ दिसते.