कलहाची बीजे

0
83

आग्य्रातील धर्मांतरण प्रकरणाचे तीव्र राजकीय पडसाद उमटू लागले आहेत आणि विद्यमान नरेंद्र मोदी सरकारला हा वाद तापदायक ठरणार असे दिसते आहे. संसदेतही त्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. ‘पुरखोंकी घर वापसी’ अशा गोंडस नावाखाली पूर्वज हिंदू असलेल्या सुमारे दोनशे मुसलमानांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचा हा जो समारंभ आग्य्रात साग्रसंगीत पार पडला, त्यात झालेले धर्मांतरण हे स्वेच्छेने झाल्याचा आयोजकांचा दावा असला तरी धर्मांतरण झालेल्यांनी दुसर्‍याच दिवशी टोपी फिरवल्याचे दिसून आले. आम्हाला बीपीएल कार्डे तयार करायची आहेत, त्यासाठी चांगले कपडे घालून या एवढेच सांगितले गेले होते. धर्मांतरण केले जाणार आहे याची काहीही कल्पना नव्हती असा दावा आता या धर्मांतरितांनी केला आहे. हे लोक बीपीएल कार्डांसाठी गेले होते तर तेथे होमहवनामध्ये सक्रियरीत्या सहभागी कसे झाले हा प्रश्न येतो. आधल्या दिवशी प्रसाद वाटणारा इसम दुसर्‍याच दिवशी या सार्‍या प्रकाराबाबत अनभिज्ञता दाखवतो, तेव्हा त्याच्या खोटेपणाबाबत शंका राहत नाही, परंतु तरीही आपल्याला धर्मांतरण करायचे नव्हते असे आता ते म्हणू लागले असल्याने हे जे काही विधी केले गेले होते, ती सारी कायद्याच्या नजरेतून तरी जोर-जबरदस्ती ठरली आहे. कदाचित प्रचंड सामाजिक दबावामुळे असेल, पण धर्मांतरणास संमती दिली ही आपली चूक झाली असे या धर्मांतरितांना वाटू लागले असण्याची शक्यता आहे. एखाद्याच्या धर्मभावनेशी असा खेळ मांडणे हा अतिशय गंभीर प्रकार आहे. धर्मांतरणाचा प्रयत्न ही तर त्याहूनही गंभीर बाब आहे. तरीही सुमारे दोनशे जणांचा धर्म बदलण्याचा हा जो काही प्रकार धर्मजागरण विभागाने केला, त्यातून शेवटी काय साध्य झाले हा प्रश्न निर्माण होतो. आपल्या देशावर जसजशी परकीय आक्रमणे झाली, तशी बाटवाबाटवीही पुष्कळ झाली. मुस्लीम आक्रमकांपासून ख्रिस्ती मिशनर्‍यांपर्यंत सर्वांनी घातलेले धार्मिक घाले, त्यांचे ओरखडे आणि जखमा अजूनही मिटू शकलेल्या नाहीत. आपली संस्कृती, पाळेमुळे खणून काढली गेल्याची व्यथा धर्मांतरितांच्या पहिल्या पिढीत दिसली, तरी आणखी काही पिढ्या गेल्यावर या मुळांचे विस्मरण होते आणि अधिक कडवेपणा दिसू लागतो. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती आपले पूर्वज हिंदू होते हे अभिमानाने सांगू लागते, तेव्हा इतरांना ते धक्कादायक वाटू शकतेे, पण ज्याच्या मनात ही जाणीव जागी असते, त्याची व्यथा त्याची त्यालाच ठाऊक असते. पण जोरजबरदस्तीच्या धर्मांतरणात जे हरवले गेले त्याची भरपाई पुनश्‍च मूळ धर्मात परतल्याने खरोखरच होऊ शकते का, या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थीच मिळते. गोव्यामध्ये मसुराश्रमाने शुद्धीकरणाची मोठी चळवळ राबवली, परंतु जे पुन्हा आपल्या धर्मात परतले, ते ‘नव’हिंदूच राहिले. परतलेल्यांना पूर्वीचा सन्मान मिळवून देण्यात आपण कमीच पडलो. त्यामुळे केवळ संख्या दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘घरवापसी’ चे कोणी कितीही प्रयत्न केले, तरी त्यातून त्यांचे सामाजिक अभिसरण होणार आहे का, सन्मानाचे जीवन जगण्याची संधी मिळणार आहे का या प्रश्नांची उत्तरे कोणी द्यायची? आग्य्रातील धर्मांतरणामागे निव्वळ राजकीय प्रेरणा दिसतात आणि आता योगी आदित्यनाथसारखे कडवे नेते वातावरण तापवण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. अलीगढमध्येही अशाच प्रकारचा समारंभ आयोजित करण्याचे घाटते आहे. स्वेच्छा आणि सक्ती यांच्यातील सीमारेषा जोवर स्पष्ट होत नाहीत, तोवर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन हे नेहमीच संशयाच्या घेर्‍यात राहील. गरीबीच्या फेर्‍यात सापडलेली माणसे थोड्या फार लाभासाठी धर्मही बदलायला राजी होतात, कारण त्यांना रोजच्या जगण्याची भ्रांत असते. धर्मांतरण करविणार्‍या प्रवृत्ती या गरिबीचाच फायदा उपटत असतात. तेल आणि मीठ देऊन धर्म बदलण्यासाठी मने वळवीत असतात. एखाद्याने आपल्या मुळांचा शोध घेत स्वतःच्या पूर्वजांच्या धर्मात परत जाण्याचे ठरवणे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तेवढे स्वातंत्र्य त्याला आपण दिले पाहिजे, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा अशा प्रकारचे समारंभ आयोजित केले जातात, तेव्हा त्यामागे राजकीय प्रेरणाच अधिक दिसते. वातावरण कलुषित होण्याखेरीज यातून दुसरे काहीही निष्पन्न होणे संभवत नाही.