कर्लिस बीच शॅकचे बांधकाम बेकायदेशीर

0
15

>> राष्ट्रीय हरित लवादाचा आदेश

हणजूण येथील कर्लिस बीच शॅक रेस्टॉरंट पाडण्यासंबंधी गोवा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन अधिकारिणीने दिलेला आदेश उचलून धरताना काल राष्ट्रीय हरित लवादाने सदर रेस्टॉरंट हे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. या रेस्टॉरंटच्या बांधकामाचा विस्तारही करण्यात आला असून बांधकामात विविध बदलही घडवून आणण्यात आले असल्याचे आपल्या आदेशात लवादाने म्हटले आहे.

सर्वे क्रमांक ४२/१० मध्ये बांधकामात आलेले हे रेस्टॉरंट १९९१ पूर्वीचे नसल्याचेही राष्ट्रीय हरित लवादाने नमूद केले आहे. १९९१ पूर्वीचे जे बांधकाम होते ते पाडून त्याजागी व्यवसायासाठीचे बांधकाम कोणतीही परवानगी न घेताच विकास न करता येणार्‍या विभागात बांधले असल्याचे म्हटले आहे. कर्लिस रेस्टॉरंटच्या सहमालक लिनेट नुनीस यांनी गोवा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन अधिकारिणीने आपले रेस्टॉरंट पाडण्याच्या जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाला राष्ट्रीय हरित लवादाकडे आव्हान दिले होते. भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या खुनाच्या घटनेनंतर हे रेस्टॉरंट चर्चेत आले होते. सोनाली फोगट यांच्या सहकार्‍याने याच रेस्टॉरंटमध्ये त्यांना अमली पदार्थ घातलेले पेय पिण्यास देऊन त्यांचा खून केल्याचा आरोप आहे.