योगसाधना- 659, अंतरंगयोग- 245
- डॉ. सीताकांत घाणेकर
भगवंत विशालहृदयी मातापिता आहे. तो हेतू बघून क्षमा करीलच. पण याचा अर्थ असा नाही की कबुलीजवाब देऊन, क्षमा मागून परत दुष्कर्म करायचे. भगवंत अत्यंत ज्ञानी आहे. त्याला कुणीही फसवू शकत नाही. तरीही आपण चुका करत असतो. मात्र प्रारब्धाचे भोग कुणालाही चुकले नाहीत.
विश्वातील बहुतेक सर्व मानव परमेश्वराला मानतात. अर्थात, थोडे अपवाद असतीलही, आणि याचे कदाचित एक कारण असेल- त्यांना परमेश्वर म्हणजे कोण, काय, कसा आहे हे ठावूकच नाही. ते प्रयत्नदेखील करत नसतील.
स्वामी विवेकानंद म्हणजे पूर्वाश्रमीचा नरेंद्र. त्यालादेखील ईश्वराला बघायचे होते. अनेक महापुरुषांना तो भेटला व विचारले, “आपण ईश्वराला बघितले आहे का?” प्रत्येकजण ‘नाही’ असेच म्हणाला. देवाच्या शोधात नरेंद्र भटकतच राहिला. शेवटी तो श्रीरामकृष्ण परमहंसांकडे पोचला. त्यांनाही त्याने विचारले तेव्हा ते म्हणाले- “हो, मी ईश्वराला पाहिले आहे. मी तुला पाहतो तसाच तो मला दिसतो.” नरेंद्र म्हणाला, “मग मला तुम्ही दाखवू शकाल का?” श्रीरामकृष्णानी म्हणे त्याला आपल्यासमोर बसवले आणि आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श त्याच्या कपाळावर भुवयांच्या मधोमध (भ्रूमध्य- आज्ञाचक्राचे स्थान) लावला. नरेंद्राचे डोळे बंद होते. लगेच त्याला देवाचे दर्शन झाले असे इतिहासकार लिहितात. यासंबंधी काही मते अशी-
- त्याला समोर दुर्गामातेचे दर्शन झाले.
- त्याला आपल्या अंगातून शक्ती संचारल्यासारखे वाटले (शक्तिपात). विजेच्या तारेला हात लावल्यावर जसा अनुभव येतो, तसा आला. तो निशंक झाला. ज्ञानी झाला.
काही का असेना, नरेंद्र श्रीरामकृष्णांसमोर नतमस्तक झाला. त्याने त्यांना सास्टांग नमस्कार घातला. तेव्हापासून गुरू-शिष्याचे नाते सुरू झाले.
या मोठ्या सत्पुरुषांच्या कथा, ज्यांची आध्यात्मिक पायरी फार अत्युच्च असते. अशा अनुभूती आमच्यासारख्या सामान्यांना येणार नाहीत, बुद्धीच्या पलीकडल्या आहेत त्या.
यासंदर्भात एक छानशी, सोपीशी गोष्ट आठवली.
एका राज्यात एक दिवस एक प्रकांड पंडित आला. फार विद्वान म्हणून सगळीकडे त्याची ख्याती होती. राजा त्याला म्हणाला की, मी तुला ईश्वरासंबंधी तीन प्रश्न विचारणार. - ईश्वर कसा दिसतो?
- ईश्वर कुठपर्यंत पाहू शकतो?
- ईश्वर करतो काय?
पंडित राजाला म्हणाला की, “तुझ्या पहिल्या प्रश्नाचे- ईश्वर कसा दिसतो?- उत्तर देण्यासाठी मला एका ग्लासात दूध दे.” दूध आल्यावर पंडिताने आपले बोट त्या दुधात घातले, बाहेर काढले व बोटाकडे बघितले. राजाने विचारले, “अहो, तुम्ही काय करता हे?” पंडित म्हणाला, “मी दुधातले लोणी बघतोय.” राजा हसून म्हणाला, “अहो, त्यासाठी दुधाचे दही बनवायला हवे. ते दही चाळले की त्यातून लोणी निघेल. त्याला अशी मोठी प्रक्रिया करायला हवी.”
पंडित म्हणाला, “बरोबर. परमेश्वर कसा दिसतो हे कळण्यासाठी तशीच मोठी प्रक्रिया आहे. - आधी आत्म्याने पवित्र व्हायला हवे, 2. काही आध्यात्मिक नियमांचे पालन करायला हवे, 3. आध्यात्मिक अभ्यास करायला हवा, 4. तसेच शास्त्रशुद्ध ध्यान करायला हवेमग ईश्वर दिसेल.
आता तुमचा दुसरा प्रश्न- ईश्वर कुठपर्यंत पाहू शकतो?- मला एक मेणबत्ती व काड्याची पेटी द्या.” पंडिताने ती मेणबत्ती पेटवली व राजाला विचारले, “या मेणबत्तीचा प्रकाश कुठपर्यंत जातो?” राजा म्हणाला, “सगळ्या दिशांनी सगळीकडे हा प्रकाश जातो.”
पंडित म्हणाला, “परमेश्वरदेखील सगळ्या दिशांनी आहे. तो सर्व सृष्टीकडे पाहतो. प्रत्येकाच्या कर्माचा हिशेब ठेवतो.
आता तुमचा तिसरा प्रश्न- ईश्वर करतो काय?” पंडित म्हणाला, “हा प्रश्न तुम्ही माझे गुरू बनून विचारता की शिष्य बनून?” राजा संस्कारी होता, नम्र होता. तो म्हणाला, “शिष्य बनून!” पंडित लगेच म्हणाला, “तुझा गुरू खाली उभा आहे आणि तू सिंहासनावर बसला आहेस.” राजाने लगेच पंडिताला सिंहासनावर बसवले व स्वतः समोर खाली उभा राहिला. पंडित म्हणाला, “ईश्वर हेच करतो. एका क्षणात राजाला रंक बनवतो व रंकाला राजा बनवतो.”
राजाला त्याच्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली. त्याला फार आनंद झाला. पंडिताला त्याने आपला गुरू मानून सास्टांग नमस्कार केला.
पंडिताने राजाला उपदेश केला-
- परमेश्वरावरील श्रद्धा सांभाळून ठेव.
- प्रभू सर्वकाही बघणार व सांभाळणार.
- आराधना, पूजा, साधना, भक्तीमध्ये काहीदेखील कमी होऊ देऊ नकोस.
आमच्यासारख्या बालबुद्धीच्या व्यक्तीना अशा साध्या, सरळ, सोप्या गोष्टी समजणे सोपे असते. जीवनाच्या प्रवासात अशा गोष्टी फार उपयोगी असतात. कारण त्यामधून मनुष्य जन्माचे रहस्य, ईश्वराचे अस्तित्व व्यवस्थित समजतो.
अशावेळी भक्त प्रल्हाद व हिरण्यकश्यपूची गोष्ट आठवते. ज्यावेळी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारले, “तुझा भगवंत- विष्णू- कुठे आहे?” तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला, “सगळीकडे आहे.” मग हिरण्यकश्यपूने विचारले, “मग या खांबातदेखील आहे?” प्रल्हादाने म्हटले- “हो, या खांबातसुद्धा आहे!”
मग हिरण्यकश्यपूने खांबावर जोरात लाथ मारली. सर्वांना माहीत आहे- नरसिंह प्रगट झाला. त्याने हिरण्यकश्यपूचा वध केला.
याचा अर्थ- प्रभू सगळीकडे आहे. तो आपल्या नकळत आपल्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देऊन आहे. म्हणूनच तत्त्ववेत्ते सांगतात- ‘कर्म करताना विचार करून, सांभाळून करा. कर्म म्हणजे फक्त कृतीने करायचे नसते तर आपल्या विचारातून व वाणीतून सतत कर्म घडत असते. या कर्माचे फळ कुणालाही चुकत नाही. म्हणून जीवनात अत्यंत दक्षता बाळगायला हवी. चुकूनदेखील दुष्कर्म घडता कामा नये. आपले संचित व प्रारब्ध या आपल्या क्रियमाणामुळे घडते. स्वतःच्या सुख-दुःखाला इतरांना जबाबदार ठरवू नये. आपणच आपले शिल्पकार असतो. कर्मसिद्धांताप्रमाणे एक गोष्ट चांगली आहे की, आपले कर्म सत्कर्म की दुष्कर्म हे त्या कर्मामागच्या हेतूप्रमाणे ठरते. म्हणून शास्त्रकार म्हणतात- ‘चांगला हेतू ठेवून केलेली दुष्कर्मे सत्कर्मे असतात. वाईट हेतू ठेवून केलेली सत्कर्मे दुष्कर्मे असतात. शेवटी भगवंत हे योग्य-अयोग्य ठरवतो.”
महाभारतातील भीष्म पितामहांची ‘शरपंजरी’ची कथा यासंदर्भात द्योतक आहे- भीष्म पितामह एका जंगलातून चालले होते. तेवढ्यात वाटेत सरडा आडवा आला. सरड्याला घोड्याच्या टापेपासून वाचवण्यासाठी त्यांनी त्याला बाणाने उचलले आणि बाजूला फेकले. पण तो सरडा काट्याच्या कुंपणात जाऊन पडला. त्याचे हाल झाले. म्हणून सरड्याच्या आत्म्याकडून मिळालेला शाप पितामहांना शरपंजरी पडून भोगावा लागला. पण त्यांचा हेतू शुद्ध होता म्हणून त्यांचे हाल झाले नाहीत. पांडव त्यांची व्यवस्थित काळजी घेत असत. स्वतः श्रीकृष्ण त्यांना नियमित भेटत असे.
मानव किती जरी बुद्धिमान असला तरी कळत-नकळत त्याच्या हातून काही चुका घडू शकतात, अपराध होऊ शकतात. म्हणून रात्री झोपतेवेळी एक सुंदर प्रार्थना म्हणायची असते-
करचरण कृतं वाक्कायजं कर्मजं वा।
श्रवणनयनजं वा मानसं वापराधम्।
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व।
जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो॥
- हात, पाय, वाणी, शरीर, कर्म, कान, नाक, डोळे, मन यांच्याद्वारे कळत-नकळत जे योग्य-अयोग्य अपराध मी केले असतील, त्या सर्व अपराधांसाठी- हे करुणासागरा, महादेवा, तुम्ही मला क्षमा करा. तुमचा जयजयकार असो.
भगवंत विशालहृदयी मातापिता आहे. तो हेतू बघून क्षमा करीलच. पण याचा अर्थ असा नाही की कबुलीजवाब देऊन, क्षमा मागून परत दुष्कर्म करायचे. भगवंत अत्यंत ज्ञानी आहे. त्याला कुणीही फसवू शकत नाही. दुर्भाग्याने हे सर्व ज्ञान असूनदेखील आपणातील अनेकजण अशा चुका करतच असतात, पण प्रारब्धाचे भोग कुणालाही चुकले नाहीत.