कर्मसिद्धांतावर अभ्यास व चिंतन करा!

0
20
  • डॉ. सीताकांत घाणेकर

योगसाधना- 664, अंतरंगयोग- 250

ध्यान करताना भगवंत- आपली माता-पिता, सद्गुरू… आम्हाला त्याच्या विविध शक्ती- ज्ञान, सत्य, प्रेम, शांती, सुख, आनंद नक्की देतील. अशी ईशशक्ती मिळाली तर आत्मशक्ती वाढेल. कुठल्याही समस्येचा व्यक्ती सामना करू शकेल.

तत्त्ववेत्ते म्हणतात की मानवी जीवन विविध रंगाच्या धाग्यांनी विणलेले आहे. काही काळे, काही सफेद. जीवन म्हटले की यश-अपयश, जय-पराजय, सुख-दुःख आलेच. नकारात्मक समस्या आल्या तर आपण त्यांचा सामना कसा करतो हे पाहणे आवश्यक. अशावेळी व्यक्तीने धीर सोडता कामा नये.
अशा घटनांची उदाहरणे अनेक आहेत-

  1. विविध विषयांच्या स्पर्धांचे कार्यक्रम असतात- लहान हॉलमध्ये, मोठ्या प्रेक्षागृहामध्ये, टीव्हीवर. अनेक लोक आपले कार्यक्रम बघतात. लहान जागेमध्ये कमी व्यक्ती असतात- शेकडो किंवा हजार; पण टीव्हीवर लाखो व्यक्ती कार्यक्रम बघतात. अशावेळी स्पर्धकांवर फार ताण असतो. आपला कार्यक्रम चांगला व्हावा, प्रेक्षकांनी आपले कौतुक करावे, टाळ्या वाजवाव्या… तरच पुढील कार्यक्रमात त्याला सहभागी करून घेतले जाईल.

स्पर्धेमध्ये तीनचार परीक्षक असतात. प्रत्येकाची आवड-निवड, ज्ञान, अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे स्पर्धकाला प्रत्येक परीक्षकाकडून तेवढेच मार्क मिळतील याची खात्री नसते. तसेच केव्हा केव्हा काही परीक्षक थोडी वाक्ये टोचून बोलतात. या सगळ्या घटनांचा परिणाम स्पर्धकावर होतो. तरीदेखील यश मिळाले तर ती व्यक्ती आपल्या चुका- कळत नकळत झालेल्या- सुधारण्याचा प्रयत्न करते. पण अपयश आले तर बहुजेकजण नाराज होतात, नाउमेद होतात.

  1. शाळा-कॉलेजात विविध तऱ्हेचे खेळ असतात. काही खेळांचे छोटेमोठे संघ असतात. बॅडमिंटन, कॅरम, टेबल टेनिस यांचे संघ लहान, तर क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी यांचे मोठे असतात. प्रत्येक खेळाचा प्रशिक्षक प्रत्येक खेळाडूचा खेळ बघून त्याला टीममध्ये घेतो अथवा वगळतो. टीममध्ये नाव आले तर बरे वाटते. पुढील तयारीला तयार राहावे लागते. नाव नाकारले गेले तर वाईट वाटते.
  2. विविध तऱ्हेच्या परीक्षा-नोकरीसाठी मुलाखती यांतदेखील यश-अपयश असतेच. अशावेळी त्या व्यक्तीच्या आप्तेष्टांनी, पालकांनी, कुटुंबाने, शिक्षकाने त्याला धीर द्यायला हवा. अपयश का आले याचा थोडा अभ्यास करायला हवा. मग पुढच्या वेळी सुधारणा होण्याची शक्यता वाढते.
    दुर्भाग्याने सगळ्या व्यक्तींच्या बाबतीत असे घडेल याची खात्री नसते. अशावेळी नैराश्यामुळे काहीजणांचा ताणतणाव फार वाढतो. जगणे कठीण होते. काहीजण आत्महत्यादेखील करतात. थोडेजण परत परत तेच तेच नकारात्मक विचार मनात आणतात. त्यामुळे तो संस्कार जास्त खोल होतो आणि अशा व्यक्ती सकारात्मक विचारापासून दूर होतात.

आपण विषय समजण्यासाठी थोडीच उदाहरणे घेतली आहेत. प्रत्येक क्षेत्रात- व्यवसाय, धंदा… येथेदेखील अशा घटना वेळोवेळी घडतच असतात. वृत्तपत्रांत यातील अनेक प्रसंग वेळोवेळी प्रसिद्ध होतच असतात. त्यामानाने सकारात्मक बातम्या कमीच असतात. काय छापायचं आणि काय नाही हे शेवटी वृत्तपत्रवालेच ठरवतात. त्यांच्या विचाराप्रमाणे, महत्त्वानुसार. शेवटी प्रत्येकाची इच्छा!
येथे मुख्य मुद्दा- अशा घटनांवर योग्य उपाय सुचवणे व त्याप्रमाणे कार्य करणे हे त्या व्यक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकजण आपल्यापरीने प्रयत्न अवश्य करतो.

  1. समुपदेशनाचा सल्ला ः येथे सर्व परिस्थितीचा विचार करून मग त्या व्यक्तीची बुद्धी, योग्यता अशा विविध विषयांचा, पैलूंचा विचार करून सल्ला दिला जातो.
  2. वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन ः अनेकवेळा त्यांना जीवनाचा अनुभव असतो. त्यांच्या जीवनातदेखील असे प्रसंग आलेले असतात. यात व्यक्तीचे नातेवाईक अथवा इतर शुभचिंतक इष्ट असतील.
  3. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन ः आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ अनुभवी असतात, तेव्हा त्यांच्याशी चर्चा करूनदेखील योग्य रस्ता सापडू शकतो.
  4. ज्योतिषी ः काहीजण ज्योतिषांकडे जातात. ते त्या व्यक्तीच्या ग्रहांचा वगैरे अभ्यास करून विविध कर्मकांडात्मक उपाय सुचवतात. त्यातील काही साधे-सोपे असतात. उदा. नामजप- कुलदेवतेचा अथवा दुसऱ्या देवतेचा, मंत्र- महामृत्युंजय, गायत्री वगैरे. इतर वेळा विविध व्रते सुचवली जातात- नियमित संकष्टी, शनिवारी हनुमान मंदिरात तेल-शेंदूर घालणे. काहीजणांना विविध स्तोत्रे म्हणावी लागतात. केव्हा केव्हा मोठी व्रतवैकल्ये करायची असतात- सत्यनारायण पूजा, लघुरुद्र, महारुद्र वगैरे.
  5. कौलप्रसाद ः अनेक गावांत कौलप्रसाद घेतले जातात. गोव्यात प्रामुख्याने या पद्धतीवर अनेक भाविकांची दृढ श्रद्धा असते. हा प्रसाद बहुतेकजण स्वतःच्या कुलदेवतेच्या मंदिरात घेतात अथवा तिथे ती प्रथा नसेल तर इतर मंदिरात घेतात.