मृत्यूनेही आज मानली असेल येथे हार |
एक मनोहर पर्व संपले, झाला अंधःकार ॥
दोन वर्षांपूर्वी याच दिवशी रात्री मनोहर पर्रीकर यांचे निधन झाले तेव्हा त्या भावपूर्ण वातावरणात आम्ही वरील ओळी लिहिल्या होत्या. समस्त गोमंतकीयांची त्या क्षणी तीच भावना होती. एखादे उत्तुंग नेतृत्व जेव्हा अस्तंगत होते, तेव्हा निर्माण होणारी पोकळीही तितकीच मोठी असते. पर्रीकर आपल्यामागे आपल्या पुत्रांसाठी राजकीय वारसा ठेवून गेले नाहीत, परंतु गोव्यासाठी आपल्या द्रष्टेपणाच्या अक्षरखुणा अगणित महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या आणि कल्याणयोजनांच्या रूपात ठेवून गेले. नद्यांनी विभागल्या गेलेल्या गोव्याला नाना सेतू उभारून जोडण्याचे काम जसे त्यांनी केले, तसेच येथील हिंदू आणि ख्रिस्ती जनतेला एका सूत्रात बांधण्याचेही केले. प्रशासनात पारदर्शकता आणणे असो अथवा भ्रष्टाचार्यांना धाक बसवणे असो, मनोहर पर्रीकर या नावाचा दबदबा गोव्याच्या राजकारणामध्ये दीर्घकाळ कायम राहिला आणि आज त्यांच्या पश्चात्ही तो ओसरलेला नाही. केंद्रात संरक्षणमंत्रिपदी गेले तेव्हा तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप अवघ्या देशभरात उमटली. लोक अचंबित झाले, विस्मयाने पाहात राहिले. त्यांचा जन्मजात साधेपणा, त्यांचा पारदर्शी कारभार, त्यांची निःस्पृहता याचे कोडकौतुक अवघ्या देशाला होते आणि आजही आहे. त्यामुळे आज त्यांच्या द्वितीय पुण्यतिथीदिनी अवघा देश या लोकनेत्याचे स्मरण भावपूर्ण अंतःकरणाने करतो आहे.
अहोरात्र सेवारत अविरत, नसता देहिं त्राण |
या भूमीच्या कल्याणास्तव हसत अर्पिले प्राण ॥
पर्रीकर नामक झंझावाताची अखेर तितकीच ह्रदयस्पर्शी आणि हेलावून सोडणारी होती. नाकात नळ्या घातलेल्या अवस्थेत जर्जर स्थितीत येऊन गोवा विधानसभेत मांडलेला राज्याचा विकाससंकल्प, अटल सेतूच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या क्षीण आवाजात ‘हाऊज् द जोश?’चा सवाल करून गोमंतकीयांच्या मनात भरलेला जोश, ह्या सगळ्या आठवणी आजही डोळ्यांच्या कडा ओलावणार्या आहेत. त्यांचा तो अखेरचा प्राणांतिक संघर्ष केवळ त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, सर्व गोमंतकीयांसाठीच जणू आपल्या एका आप्ताचा संघर्ष बनला होता. शेवटी ती प्रदीर्घ झुंज थांबली. जन्म आणि मृत्यूमध्ये फक्त एका श्वासाचे अंतर असते म्हणतात. तो श्वास थांबला. जणू गोव्याचा श्वासही थांबला. कंठ रुद्ध झाला.
कर्मवीर हा द्रष्टा नेता असा शौर्यशाली |
अनाथ झाल्या भूमीला या आता कोण वाली?॥
पर्रीकर गेले तेव्हा ‘आता गोव्याचे पुढे कसे होणार?’ हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर उभा राहिला. आजही त्या प्रश्नाचे उत्तर गोव्याला पूर्णांशाने मिळालेले नाही.
पर्रीकरांनी गोव्यात भारतीय जनता पक्षाला कुठल्या कुठे नेऊन ठेवले. एक काळ होता जेव्हा भारतीय जनता पक्षाला येथे स्वीकारार्हता नव्हती. लोक तुच्छतेने पाहायचे. परंतु मनोहर पर्रीकर नावाचा झंझावात जसजसा घोंगावू लागला आणि त्याने सारी सूत्रे आपल्या हाती घेतली, तेव्हापासून चित्र बदलू लागले. सत्तेच्या परिघात पक्षाने प्रवेश केला आणि मग तर चित्र झपाट्याने बदलले. कालपर्यंत जे पक्षाला पाण्यात पाहायचे ते पक्षाचे आप्त झाले. आजच्या भाजपविषयी न बोललेलेच बरे!
कोणत्याही माणसात असणारे अपूर्णत्व पर्रीकरांतही होते. गुण होते, तसेच दोषही होते. त्यांच्याभोवती गोळा झालेल्या कोंडाळ्याने स्वतःचे कोटकल्याण करून घेताना त्यांचे नुकसानही खूप केले. जसे त्यांचे चाहते प्रचंड, तसेच त्यांच्याविषयीच्या पराकोटीच्या द्वेषाने भरलेले शत्रूही अमाप होते. जवळचे लोकही दूरचे झाल्याचे पाहणेही त्यांच्या नशिबी होते. पर्रीकरांचे सगळेच निर्णय बरोबर होते असे नव्हे. अनेक निर्णय चुकले, अनेकांच्या बाबतीत घूमजाव करण्याची नामुष्की पत्करावी लागली, परंतु जे केले त्या सर्वांमध्ये व्यक्तिगत स्वार्थाचा लवलेशही नव्हता हे सर्वांत महत्त्वाचे आहे. अशी निःस्पृहता आजच्या राजकारणात तर दुर्मिळातली दुर्मीळ आहे. त्यामुळेच आज त्यांच्या पश्चात् त्यांचे विरोधकही मनोमन त्यांच्यातील या निःस्पृहतेविषयी आदर बाळगतात. आज मनोहर पर्रीकर यांचे स्मरण करीत असताना फुकाचे पवाडे आळवण्यापेक्षा त्यांचे अनुयायी म्हणवणार्यांनी या निःस्पृहतेचा, निःस्वार्थतेचा अंगिकार करावा, त्या समर्पित अखंड कार्यनिष्ठेचा जमत असेल तर वसा घ्यावा. हे अर्थातच सोपे नाही. केवळ आपल्या कार्यातून आणि व्यक्तिमत्त्वातून जनमानसात अढळ स्थान निर्माण करणारा असा लोकनेता क्वचितच जन्माला येत असतो. गोव्यात भाऊसाहेब बांदोडकर आणि मनोहर पर्रीकर ही दोन अशी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे होऊन गेली, ज्यांची नाळ तळागाळातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेशी जुळलेली राहिली. शेवटी ही नाळ जुळणे महत्त्वाचे असते आणि ती सहजासहजी जुळत नसते. त्यामागे समर्पण असते! म्हणूनच –
कधि न झाला, पुन्हा न होणे ऐसा लढवय्या |
अता तरी या वीरा लाभो स्वर्गी सुखशय्या ॥