>> दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री; जननायक अशी ओळख; आज 100 वी जयंती
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार काल जाहीर झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केलेल्या निवेदनात ही घोषणा करण्यात आली. कर्पूरी ठाकूर हे दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री होते. तसेच ते त्यांच्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध होते. बिहारचे जननायक अशी त्यांची ओळख होती. कर्पूरी ठाकूर यांची बुधवारी म्हणजे 24 जानेवारी रोजी शंभरावी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. मागासवर्गीयांच्या हितासाठी त्यांनी सातत्याने काम केल्याने त्यांच्या कार्याचा हा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्नने गौरविले जाणार आहे.
कर्पुरी ठाकूर हे बिहारच्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये आदर्श असे व्यक्तिमत्व होते. मागासवर्गीय समाजाचा विकास आणि सामाजिक न्यायाची कल्पना ही तळागाळात पोहोचवण्यासाठी कर्पूरी ठाकूर हे ओळखले जातात. बिहारच्या राजकारणात कर्पूरी ठाकूर हे अतिशय सन्माननीय नाव आहे.
कर्पूरी ठाकूर यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील पितौंझिया या गावा झाला. 1952 मध्ये ते पहिल्यांदा बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि 1988 पर्यंत सलग 36 वर्षे बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. या काळात त्यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. ते बिहारचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते. तसेच एकदा त्यांनी उपमुख्यमंत्रीपदही सांभाळले होते. एवढी मोठी राजकीय कारकीर्द असली तरीही कर्पूरी ठाकूर हे सर्वात गरीब नेते म्हणून ओळखले जात होते. कर्पूरी ठाकूर इतके दिवस आमदार आणि मुख्यमंत्री राहिले; पण त्यांना गाडीही घेता आली नाही. कर्पूरी ठाकूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी तळागाळातील समाजाला शिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला.