कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काल 70.69 टक्के मतदानाची नोंद झाली. कर्नाटकात प्रथमच 94,000 हून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी घरातून मतदान केले. कर्नाटकमध्ये 224 जागांवर 2614 उमेदवार मैदानात आहेत. त्यांचे भवितव्य शनिवार दि. 13 मे रोजी स्पष्ट होणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काल दुपारी 3 वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा टक्का साडेचार ते पाच टक्क्यांनी वाढून तो सायंकाळी 6 वाजेपर्यंत 70.69 टक्क्यांवर पोहोचला.
कर्नाटकात मतदानादरम्यान तीन ठिकाणी हिंसक घटना घडल्या. विजयपुरा जिल्ह्यातील बसवना बागेवाडी तालुक्यात लोकांनी काही ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीनची तोडफोड केली, असे पोलिसांनी सांगितले. तसेच मतदान अधिकाऱ्यांच्या वाहनांचेही नुकसान केले. अधिकारी यंत्रे बदलून मतदानात छेडछाड करत असल्याची अफवा येथे पसरली होती.
दुसरी घटना पद्मनाभ विधानसभेच्या पपया गार्डन मतदान केंद्रावर घडली, जिथे लाठ्या घेऊन काही तरुणांनी विरोधकांवर हल्ला केला. या हल्ल्यात मतदानासाठी आलेल्या काही महिलाही जखमी झाल्या आहेत. तिसरी घटना बेल्लारी जिल्ह्यातील संजीव नारायण कोटे येथे घडली, जिथे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
काँग्रेस 130-135 जागा जिंकेल : मल्लिकार्जुन खर्गे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस कर्नाटकात 130 ते 135 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकांना हे सरकार बदलायचे आहे. भ्रष्टाचार हटवून विकास घडवून आणणारे सरकार त्यांना हवे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सत्तेत यावा असे लोकांना वाटत असल्याचे मत खर्गे यांनी व्यक्त केले.