कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज एस्. बोम्माई यांनी गुरुवारी कर्नाटकातील कायदा आणि तांत्रिक तज्ज्ञांशी बैठक घेऊन गोवा व तामिळनाडू ह्या राज्यांबरोबर असलेल्या म्हादई पाणी तंटा वादावर तोडगा काढण्यासाठी रणनीती तयार केली.
यानंतर पत्रकारांशी कर्नाटकातील पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की कर्नाटक, गोवा व तामिळनाडू या राज्यांमध्ये म्हादई नदीच्या पाण्याच्या विवादाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले की, कर्नाटक भवनात झालेल्या या बैठकीत ज्येष्ठ अधिवक्ते मोहन खत्री व श्याम दिवाण यांची भेट घेतली. यावेळी म्हादई पाणी तंट्याबाबत चर्चा झाल्याचे ते म्हणाले. न्यायालयातील पुढील सुनावणीच्या वेळी राज्य सरकारची भूमिका सविस्तरपणे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हादई नदीवरील कळसा भंडुरा प्रकल्पावरील वाददेखील चर्चेला आला. याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे ते म्हणाले. विशेष अनुमती याचिकेच्या मुख्य मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.