कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन सुरू असून काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचलले जात आहेत. कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचा भारतात सर्वप्रथम कर्नाटक राज्यात रुग्ण आढळून आला असताना राज्यात आता तब्बल ६९ विद्यार्थी व शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
चिकमंगळुरू जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात ४०विद्यार्थी/शिक्षक कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचवेळी, शिवमोगा येथील एका शाळेतील २९ मुलांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. शिवमोगा उपायुक्त केबी शिवकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी नर्सिंग स्कूलमध्ये २९ मुलांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. रँडम सँपलिंगमध्ये ही मुले पॉझिटिव्ह आढळली असून यातील बहुतांश मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. शिवकुमार यांनी ही मुले वेगवेगळ्या राज्यातून या खासगी नर्सिंग स्कूलमध्ये आली आहेत. आम्ही वसतिगृहाचा परिसर सील केला आहे.