कर्नाटकात काँग्रेसला सर्वाधिक जागा शक्य

0
12

>> बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांतून अंदाज व्यक्त; त्रिशंकू विधानसभा आल्यास जेडीएस किंगमेकरच्या भूमिकेत

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. मतदान संपताच अनेक वृत्तवाहिन्या व संस्थांचे मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) अंदाज समोर आले, त्यात बहुतांश वृत्तवाहिन्या व संस्थांनी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील किंवा काँग्रेसला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. काही मतदानोत्तर चाचण्यांत कर्नाटक विधानसभेत त्रिशंकू स्थिती निर्माण होऊन जेडीएस पुन्हा किंगमेकर बनेल, असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, मतमोजणी 13 मे रोजी होणार असून, भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे स्पष्ट होणार आहे.

काल मतदान प्रक्रिया पूर्ण होताच विविध मतदानोत्तर चाचण्यांचे कल जाहीर होऊ लागले. त्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार किंवा काँग्रेस बहुमताचा आकडा गाठणार असा अंदाज वर्तवण्यात आला. इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 62 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला 122 ते 140 जागांवर विजय मिळू शकतो. जेडीएसला 20 ते 25 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
टीव्ही 9 भारतवर्ष-पोलस्ट्रेट एक्झिट पोलनुसार, भाजपला 88-98 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 99-109 जागा मिळू शकतात. बहुमतापेक्षा हा आकडा कमी आहे. या एक्झिट पोलमध्ये जेडीएसला 21-26 जागा मिळण्याची अपेक्षा आहे, तर इतरांना 0-4 जागा मिळू शकतात.

टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला बहुमत मिळू शकते. काँग्रेसला 106 ते 120 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपला 78 ते 92 जागा मिळू शकतात. जेडीएसला 20 ते 26 जागा आणि इतर 2 ते 4 जागा मिळू शकतात.
झी न्यूज आणि मॅट्रिज एजन्सीच्या एक्झिट पोलनुसार, भाजप 79-94 जागा जिंकू शकतो, तर काँग्रेस 103-118 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनू शकतो किंवा बहुमत मिळवू शकतो. जेडीएसला 25-33 जागा मिळू शकतात आणि इतर आणि अपक्ष 2-5 जागा जिंकू शकतात.एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ जाताना दिसत आहे. पक्षाला 100 ते 112 जागा मिळू शकतात, तर भाजपला 83 ते 95 जागा मिळण्याची शक्यता आहे. जेडीएसला 21 ते 39 जागा, तर इतरांना 2 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

टुडेज चाणक्य-न्यूज 24 च्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 120 जागांसह बहुमत मिळताना दिसत आहे. भाजपला 92 जागा मिळतील, तर जेडीएसला 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये इतर पक्षांचे खाते उघडताना दिसत नाही. दरम्यान, भाजपला पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास आहे, तर दुसरीकडे आम्हीच सत्तेत येऊ, असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. तिसऱ्या बाजूला 2018 प्रमाणे आपण किंगमेकर ठरू शकतो अशी जेडीएसला अपेक्षा आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष
लागून आहे.

गेल्या 5 निवडणुकीत 3 वेळा त्रिशंकू विधानसभा
कर्नाटकात गेल्या 38 वर्षांपासून दर 5 वर्षांनी सत्ताबदल होत आहे. शेवटच्या वेळी रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाने 1985 मध्ये सत्तेत असताना निवडणूक जिंकली होती. त्याच वेळी, गेल्या पाच निवडणुकांपैकी (1999, 2004, 2008, 2013 आणि 2018) एकाच पक्षाला केवळ दोनदा (1999, 2013) बहुमत मिळाले. 2004, 2008, 2018 मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. इतरांच्या पाठिंब्यावर त्यांनी नंतर सरकार स्थापन केले.

लिंगायत-वोक्कलिगा मतदार निकाल ठरवतील
राज्यात 17 टक्के लिंगायत मतदार असून, 75-80 जागांवर त्यांचा प्रभाव आहे. वोक्कालिगा मतदार जे लोकसंख्येच्या 14 टक्के आहेत, ते 50-55 जागांवर प्रभाव टाकतात. 9.5 टक्के कुर्बा मतदार 25-30 जागांचे निकाल बदलतात. 32 टक्के अनुसूचित जाती मतदार 30-35 जागांसाठी आणि 17 टक्के मुस्लिम मतदार 35-40 जागांचा निकाल ठरवण्यात निर्णायक भूमिका बजावतात.

छोटे पक्ष मैदानात उतरल्याने मोठ्या पक्षांना फटका
कर्नाटकमध्ये थेट लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. तिसरा मोठा पक्ष जेडीएस आहे. यावेळी आम आदमी पक्ष, बसपा, उत्तम प्रजाकिया पार्टी, डावे पक्ष, कर्नाटक राष्ट्र समिती, कल्याण राज्य प्रगती पक्ष या छोट्या पक्षांनीही उमेदवार उभे केले आहेत. या छोट्या पक्षांमुळे आपली मते कमी होण्याची भीती भाजप, काँग्रेससह जेडीएसला आहे. या पक्षांनी एक ते दहा हजार मते कमी केल्यास निकालावर मोठा परिणाम होऊ शकतो. गेल्या निवडणुकीत अपक्षांसह अपरिचित पक्षांना 4.11% मते मिळाली होती.