कर्नाटकात आज मतदान

0
10

5.31 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवार दि. 10 मे) सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार असून, ते राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून, राज्यभरातील एकूण 58,545 मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा प्राप्त करुन देण्यात आली आहे. मतदानादरम्यान एकूण 75,603 बॅलेट युनिट, 70,300 कंट्रोल युनिट आणि 76,202 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल वापरण्यात येणार आहेत.

राज्यभरातील एकूण 5,31,33,054 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. या मतदारांमध्ये 2,67,28,053 पुरुष मतदार, तर 2,64,00,074 महिला मतदार आहेत. राज्यात 11,71,558 तरुण मतदार आहेत, तर 5,71,281 दिव्यांग मतदार आहेत. तसेच 12,15,920 मतदार हे 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष, तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य बुधवारी मतपेटीत बंद होणार आहे.

कुणालाही सलग सत्ता नाही
कर्नाटक या राज्याचे वैशिष्ट्‌‍य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतोय. हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले, तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी व सोनिया गांधी यांनी देखील प्रचाराचा धडाका लावला होता. त्यामुळे आता जनता कुणाच्या पाठिशी राहते आणि कुणाला बाजूला सारते हे 13 मे रोजीच्या निकालावेळी समजेल.