गोव्यातील खाण पट्ट्यात सध्या जीवनावश्यक सेवेच्या नावाखाली कोरोनाचा फैलाव झालेल्या कर्नाटकातून येणार्या सुमारे २०० ट्रकांची बेदरकार वाहतूक चालू आहे. या वाहतुकीवर सरकारने त्वरित नियंत्रण आणावे अशी मागणी करत गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या ट्रकांना परवानगी कोणी दिली असा सवाल केला आहे.
या खनिज वाहतुकीमुळे स्थानिक लोकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे भयंकर अपघात होण्याचे संकट उभे ठाकले आहे. देशात लॉकडाऊनमुळे आंतरराज्य वाहतूक बंद असतानाही गोवा सरकारने खनिज ट्रक वाहतुकीला कोणत्या आधारे परवानगी दिली हे स्पष्ट करावे. तसेच मोदी सरकारने खाण व्यवसायाचा जीवनावश्यक सेवामध्ये समावेश केला आहे का हेही सरकारने स्पष्ट करावे असे चोडणकर यांनी म्हटले आहे.
स्थानिक खाण अवलंबीतांवर सध्या उपासमारीची पाळी आलेली असताना, गोमंतकीयांचे ट्रक वापरणे सोडून सरकार आज कर्नाटकातील ट्रक मालकांना व चालकांना परवानगी देते, यावरून गोव्याच्या भाजप सरकारची गोमंतकीयांप्रती असंवेदनशीलता परत एकदा उघड झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या कर्नाटकातून येणारे ट्रकचालक, क्लिनर यांची कोरोना चाचणी केली जाते का व त्यांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र कोण देतो हे सरकारने लोकांना सांगणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून गोमंतकीयांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास त्याची जबाबदारी सरकारवर राहणार असल्याचा इशारा यावेळी चोडणकर यांनी दिला.