कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कारवार अंकोला मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार रूपाली नाईक, काँग्रेसतर्फे माजी आमदार सतीश सैल, जेडीयूस पक्षातर्फे चित्रा चंद्रहास कोठारकर आणि माजी आमदार गंगाधर भट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे बळावली आहेत.
भाजपतर्फे उमेदवारी दाखल करतेवेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विधानपरिषदेचे सदस्य गणपती उळवेकर, कारवारचे नगराध्यक्ष डॉ. नितीन पिकळे, पक्षाचे अन्य प्रमुख कार्यकर्ते माठ्या संख्येने उपस्थित होते. कारवारच्या माला देवी मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आलेल्या मिरवणुकीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
काँग्रेंसतर्फे उमेदवारी दाखल केलेल्या सतीश सैल यांनी मालादेवी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर असंख्य कार्यकत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते रामानंद नाईक, प्रभाकर नाईक, शंभू शेट्टी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जेडीएसच्या उमेदवार चित्रा कोठारकर मालादेवी मैदानावरून देवीची पूजा करून मिरवणुकीने निवडणूक कार्यालयात प्रवेश केला. माजी आमदार गंगाधर भट यांनी आपल्या समाजाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे यावेळी सांगितले.
आनंद अस्नोटीकर
यांच्यावर लक्ष
माजी आमदार स्व. वसंत अस्नोटीकर यांचे सुपुत्र माजी मंत्री आनंद अस्नोटीकर यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी ठेवली होती. मात्र अकस्मात त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारवार अंकोला मतदारसंघात स्व. वसंत अस्नोटीकर यांचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग असून ऐनवेळी आनंद अस्नोटीकर यांनी आपली भूमिका जाहीर केल्यामुळे या मतदारसंघातील समीकरण एकदम बदलण्याची शक्यता आहे.