पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी मानल्या जाणार्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांचा निकाल आज जाहिर होणार आहे. एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू विधानसभेची शक्यता वर्तविली असून जेडीएस किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने कॉंग्रेस गड राखतो की भाजप मुसंडी मारतो याकडे तमाम देशवासियांच्या नजरा लागून आहेत. आज सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असून तासाभरात निकाल हाती येण्यास सुरूवात होईल. संध्याकाळी उशिरा चित्र स्पष्ट होणार आहे.
ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातला मुकाबला असून कर्नाटकात मोदी लाट पाहण्यास मिळते की कॉंग्रेस आपला गड राख़ून ठेवते याकडे अवघ्या देशाचे लक्ष्य लागले आहे. कर्नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे १९८५ नंतर येथे एकही सरकार पुन्हा सत्तेवर आलेले नाही. त्यामुळे सिद्धरामय्या सरकारला खाली खेचण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले आहेत. त्यामुळे कर्नाटकात विजयी पताका फडकावून भाजप दक्षिण दिग्विजयाचे द्वार उघडणार का हे आज निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असून ३० मतमोजणी केंद्रांवर छावणीचे स्वरूप आले आहे. पोलीस यंत्रणा आणि इतर सुरक्षा यंत्रणा सुरक्षेच्या बाबतीत सजग आहे. वैध ओळखपत्र असलेल्या कर्मचार्यांना व अधिकार्यांनाच मतदान केंद्राच्या परिघात प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निमलष्करी दल, कर्नाटक राखीव पोलीस दर, साध्या वेशातले पोलीस या सर्वांवर संयुक्तपणे सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी खरगे उत्सुक
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव चर्चेत असून वेळ पडली तर मुख्यमंत्री होईन, पण दलित म्हणून नव्हे तर एक ज्येष्ठ कॉंग्रेस नेता म्हणून असे खरगे यांनी म्हटले आहे. दलित नेत्यासाठी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार असल्याचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले होते. खरगे सध्या लोकसभेत कॉंग्रेसचे गटनेते आहेत.