कर्नाटककडून सहा धरणांच्या प्रस्तावामुळे दूधसागरास धोका

0
85

कर्नाटकाने दूधसागर धबधब्याला येऊन मिळणार्‍या नद्यांवर सहा धरणांचा प्रस्ताव म्हादई जल लवादाकडे नव्याने सादर केला असून तो मान्य झाल्यास दूधसागरावर संकट ओढवणार आहे. आता ३ सप्टेंबर रोजी म्हादई जल लवादासमोर सुनावणी असून यावेळी त्यावेळी गोव्याकडून या प्रस्तावास विरोध करण्याची मागणी पर्यावरणवादी करीत आहेत.
डिसेंबर २०१३मध्ये म्हादई पाणी वाटप लवादाचे शिष्टमंडळ कर्नाटकाच्या भेटीवर गेले असता कर्नाटक जलसंसाधन खात्याच्या अधिकार्‍यांनी सहा धरणांचा प्रस्ताव असल्याचे स्पष्ट केले होते. दिग्गी योजनेअंतर्गत बारोली व मरानालावर दोन धरणांचा प्रस्ताव तयार असून वीरझोळ योजनेंतर्गत पसायानाला उपनदीवर दोन धरणांचा प्रस्ताव आहे. त्याशिवाय काटला व पाळणा या दोन उपनद्यांवर दोन धरणांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र या धरणांचे बांधकाम झाले तर दूधसागरास धोका निर्माण होणार आहे.
दुधसागरकडे येणार्‍या उपनद्यांना सहा धरणाद्वारे बंदिस्त केले तर धारबांदोडा, फोंडा, तालुक्याला जगवणारी खांडेपार नदीची अवस्था बिकट होणार आहे. पणजी, फोंडा महालाला पाणी पुरवणारा ओपा प्रकल्प खांडेपार नदीवर उभारलेला असून येथील लोकजीवनावर त्याना गंभीर परिणाम होणार असल्याचे राजेंद्र केरकर यांनी सांगितले.