कर्तव्य बजावण्यास गेलेल्या पोलीसावर प्राणघातक हल्ला

0
126

>> भीमवेळ मांगूरच्या एका कुटुंबातील चौघांना अटक

नौदल हद्दीत आग लावणार्‍या दोरादो कुटुंबियांना भीमवेळ (वास्को-मांगूर) समुद्रकिनार्‍यापासून अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भगत यांच्यावर इनासियो दोरादो याने कुर्‍हाडीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. उपनिरीक्षक भगत यांच्यावर काल पहाटे बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

वास्को पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ यानी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री नौदलाच्या हद्दीत आग लागल्याची माहिती मिळाली असता आग विझविण्यासाठी वास्को पोलिस व अग्निशामक दलाने नौदल हद्दीत जाऊन आगीवर नियंत्रण आणले. सदर आग दोरादो कुटुंबियांनी लावली असल्याचे नौदल पोलिस स्थानकात तसेच वास्को पोलिस स्थानकात तक्रार नोंदविली. त्यानुसार वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रशांत भगत आपल्या सहकार्‍यांसह भीमवेळ येथे इनासियो दोरादो यांच्या घरी त्यांना अटक करण्यासाठी गेले असता त्यांच्यात बराचवेळ बाचाबाची झाली. इनासियो दोरादो याने आपल्या घरात जाऊन कुर्‍हाड घेऊन उपनिरीक्षक भगत यांच्या मानेवर वार केला त्यावेळी भगत यांनी सदर वार चुकविण्यासाठी आपला उजवा हात पुढे केला असता त्यांच्या उजव्या हाताची दोन बोटे छाटली गेली. तसेच उजव्या हाताला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. नंतर इतर पोलिसांनी दोरादो कुटुंबियांवर नियंत्रण आणून उपनिरीक्षक भगत यांना उपचारासाठी चिखली कुटीर रुग्णालयात आणले. जखम गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना तातडीने गोमेकॉत हलविण्यात आले. रविवारी पहाटे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

वास्को पोलिसावर हल्ला प्रकरणी दोरोदो कुटुंबियातील हल्लेखोर इनासियो दोरादो (६४), सुकोरीना दोरादो (३४), जुझे दोरादो (३८), मिकायल दोरादो (६०) यांना भा.द.स. ३०७, ३५३ या कलमाखाली अटक करण्यात आली. नौदल व दोरादो कुटूंबिय यांच्यात तेथील या जागेसाठी मुरगाव मामलेदार कार्यालयात अनेक वर्षांपासून खटला सुरू आहे. दोरादो कुटुंबियांना सरकारकडून मिळणार्‍या वीज व पाणी जोडणी मिळालेली आहे. भीमवेळेवर नौदल आपला हक्क बजावण्यास शोधत असल्याने दोरादो कुटुंबियांनी नौदलाविरुध्द न्यायालयीन लढा पुकारलेला आहे.